नगर - जवखेडा(ता. पाथर्डी) येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडातील आरोपी दिलीप जगन्नाथ जाधव, त्याची दोन मुले प्रशांत आणि अशोक यांच्यावर येत्या २५ एप्रिलला दोषनिश्चिती होणार आहे. आरोपींच्या वतीने आैरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी खंडपीठाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागवले अाहे. जामीनअर्जावरील निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने दोषनिश्चितीची प्रक्रिया पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव हे १३ एप्रिलला आपले म्हणणे मांडणार आहेत.
जवखेडे येथील संजय जगन्नाथ जाधव, त्यांची पत्नी जयश्री मुलगा सुनील जाधव यांचे निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आले होते. सुरुवातीला दलित हत्याकांड असल्याचा संशय असल्यामुळे या घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पण पोलिसांनी संजय याचा भाऊ दिलीप त्याची दोन मुले प्रशांत आणि अशोक यांना अटक केली. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यानुसार प्रकरणाचा तपास केला आणि न्यायालयात सुमारे साडेपाच हजारांहून अधिक पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव काम पहात आहेत. दिलीप, प्रशांत आणि अशोक जाधव यांनी अॅड. सुनील मगरे यांच्यामार्फत नगरच्या जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. पण अॅड. यादव यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींचे जामीनअर्ज फेटाळले. त्यानंतर तिघांनी पुन्हा हायकोर्टात जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे मागवण्यात आले असून अॅड. उमेशचंद्र यादव हे येत्या १३ एप्रिलला सरकार पक्षाची बाजू मांडणार आहेत.
बुधवारी जवखेडे तिहेरी हत्याकांडप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयात तिन्ही आरोपींवर दोषनिश्चिती होणार होती, पण आरोपींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी मंुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज करण्यात आले असून त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे दोषनिश्चितीची प्रक्रिया पुढे ढकलावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला. त्यावर विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव यांनी तीव्र आक्षेप घेतला.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दोषनिश्चितीची प्रक्रिया २५ एप्रिलपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एस. कुलकर्णी यांनी सुनावला.