आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार गांधींविरुद्ध गुन्हा दाखल करा, आंदोलनाचा शेतकरी संघटनेचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तंबाखूच्या सेवनाने कॅन्सर होत नाही, उलट अन्नाचे पचन होण्यास मदत मिळते, असे वक्तव्य करणाऱ्या खासदार दिलीप गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात श्रीरामपूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. गुन्हा दाखल झाल्यास १५ एप्रिलला प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेने पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी तंबाखूच्या सेवनाने सात प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात, असा अहवाल दिल्यानंतर सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवर तंबाखूचे सेवन घातक असल्याचा इशारा देणे बंधनकारक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिटावरील या इशाऱ्याची जागा ४० वरून ६० टक्के करण्याचे आदेश दिले. असे असतानाही तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार गांधी यांनी तंबाखू सेवनाचे समर्थन करणे अयोग्य आहे. दूरचित्रवाणीवरून तंबाखू सेवन घातक असल्याचे सरकारने जाहिरातींद्वारे वारंवार दाखवून जनजागृतीचा उपक्रम राबवला. सरकारी धोरणाला छेद देत गांधी यांनी जाहीरपणे तंबाखू सेवनाचे समर्थन केल्याने जनतेत गैरसमज निर्माण झाला आहे. त्यातच तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांकडून सत्कार स्वीकारून गांधी यांनी कळस केल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला.

गांधी यांच्या वक्तव्याने सरकारने आतापर्यंत केलेल्या जनजागृतीवर पाणी फेरले आहे. तंबाखू सेवनाबाबत गैरसमज पसरवून लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे. एप्रिलला तशी तक्रार श्रीरामपूर पोलिस ठाण्यात संघटनेकडून करण्यात आली आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी सूचना देऊन गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागणीप्रमाणे कार्यवाही झाल्यास १५ ला प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष बबन पटारे यांनी दिला आहे.