संगमनेर (जि. नगर) - भाविकांची बोलेरो आणि दहाचाकी मालट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन कुटुंबांतील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. अत्यवस्थ दोघांना पुण्याला हलवण्यात आले. उर्वरित जखमींवर संगमनेरमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात सोमवारी पहाटे घडली. सर्व मृत परदेशवाडी (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत.
खेडभैरवच्या परदेशवाडी (ता. इगतपुरी) येथील वाजे आणि पडवळे कुटुंबीय बोलेरोमधून देवदर्शनासाठी गेले होते. पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, जेजुरी येथे देवदर्शन घेऊन सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास इगतपुरीकडे परतत असताना पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या बोटा शिवारात हॉटेल कामतसमोर समोरून येणार्या दहाचाकी मालट्रकची बोलेरोला धडक बसली. यात बोलेरोमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित नऊ जण जखमी झाले. जखमींना तातडीने संगमनेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाजे व पडवळे या दोन कुटुंबांतील सोळा सदस्यांत सहा बालकांचा समावेश होता. त्यापैकी तीन बालकांचा मृत्यू झाला. अन्य मृतांत तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.
जखमींत चार मुले, दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वसंत तांबे यांनी दिली. हा अपघात चालकाच्या झोपेच्या तंद्रीत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
मृतांची नावे
भैरू वामन पडवळे (60), काळू भैरू पडवळे (25), त्यांच्या मुली सरिता (5), आशा (8 वर्षे) तसेच पांडुरंग शांताराम वाजे (35), रोहिणी राजाराम वाजे (3) व वनिता जयराम वाजे (25) अशी दोन्ही कुटुंबांतील मृतांची नावे आहेत. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत.
जखमींची नावे
राजाराम बळवंत वाजे, संकेत राजाराम वाजे, विशाल पांडुरंग वाजे, बबलू पांडुरंग वाजे, अश्विनी पांडुरंग वाजे, गोरख राणू वाजे (चालक), मंगेश बाळकृष्ण पडवळे, देविदास बाळकृष्ण पडवळे व लक्ष्मीबाई बाळकृष्ण पडवळे यांचा जखमींत समावेश आहे. त्यापैकी राजाराम वाजे व गोरख वाजे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुणे येथे हलवण्यात आले आहे.