जामखेड- एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. कुटुंबाचा मोठा आधार गेला. मुलाच्या जाण्याने मनाला झालेल्या वेदनांनी विव्हळत सारेच रुग्णशय्येवर पडून आहेत. अनेकांनी सांत्वन केले, आश्वासनांचा पूर लोटला, पण भविष्याचे काय?... खर्ड्याच्या आगे कुटुंबाला विदारक, विषण्ण वर्तमानात हाच प्रश्न सध्या अस्वस्थ करत आहे.
आगे कुटुंबातील एकुलता एक मुलगा नितीनची प्रेमसंबंधातून गेल्या सोमवारी (28 एप्रिल) अमानुष हत्या झाली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले. याप्रकरणी 13 आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असले, तरी या कुटुंबाच्या मनात आजही भीतीचे सावट आहे. आम्हाला खरेच न्याय मिळणार का, हा त्यांचा प्रश्न आहे. नितीनच्या शवचिकित्सा अहवालाबाबत आगे कुटुंबीय उघडपणे शंका उपस्थित करत आहेत. प्राथमिक अहवालात नितीनला मारहाण करून नंतर गळा आवळून मारल्याचे म्हटले आहे. मात्र, आगे कुटुंबीय व दलित नेते यावर आक्षेप घेत आहेत. सांत्वन करायला येणाºया प्रत्येक नेत्यासमोर आगे कुटुंबीय ही बाब मांडत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नितीनला गरम सळईने चटके देण्यात आले. त्याच्या अंगावर तशा जखमा होत्या. परंतु तसा उल्लेख अहवालात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. शाळेतील शिक्षकांनी नितीनला घेऊन जाताना आक्षेप घेतला असता आणि ही बाब पोलिसांना कळवली असती, तर त्याचा जीव वाचला असता. त्यामुळे संबंधित शिक्षकांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी आगे कुटुंबाने केली आहे. दरम्यान, भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तपास योग्य दिशेने चालू असल्याचा दिलेला निर्वाळा आगे कुटुंबाला दिलासा देणारा ठरला.
आज आगे कुटुंबाला मानसिक आधाराबरोबरच आर्थिक आधाराची नितांत गरज आहे. घरातील वंशाचा दिवा गेल्याने त्यांच्यापुढे अंधार पसरला आहे. घटना घडल्यानंतर सर्वात प्रथम रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आगे कुटुंबाची भेट घेतली. नंतर जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी मदत जाहीर केली. प्रत्यक्षात ही रक्कम आगे कुटुंबाच्या हातात पडेल तो सुदिन म्हणावा लागेल. मागील आठ दिवसांत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, खासदार हुसेन दलवाई, आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री गंगाधर गाडे, आमदार कपिल पाटील, आमदार जयदेव गायकवाड, आमदार राहुल मोटे, आमदार राम शिंदे, माजी आमदार सदाशिव लोखंडे आदींनी आगे कुटुंबाची भेट घेतली. परंतु मदतीच्या घोषणा करण्यापलीकडे काहीही घडले नाही. रोख स्वरूपात तातडीची मदत करण्याची सुबुद्धी त्यांना सुचली नाही. याला अपवाद बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे. त्यांनी स्वत:कडील 25 हजारांची रोख मदत दिली.समाजकल्याण विभागामार्फत 1 लाख 87 हजार 500 रुपयांचा धनादेश आगे कुटुंबाला देण्यात आला आहे. भविष्याची चिंता पूर्वीच होती. आता एकुलता एक मुलगा गेल्याने भविष्यच राहिलेले नाही, ही नितीनची आई रेखा यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. यातून या कुटुंबाचे वास्तव समोर आले आहे.
आगे कुटुंब मूळचे गितेवाडीचे. खर्ड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावातही आगे कुटुंबाला कसलीही शेतजमीन नाही. उदरनिर्वाहासाठी ते खर्डा येथे आले. दोन मुलींनंतर जन्मलेल्या नितीनला एकूण तीन बहिणी आहेत. खर्डा ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीवर खर्डा-जातेगाव रस्त्यावर दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब राहते. थोरल्या दोन मुलींची लग्ने झाली आहेत. धाकटी मुलगी शिक्षण घेत आहे. गितेवाडीत असताना आगे दांपत्याने ऊसतोडणी मजूर म्हणून काम केले. नितीनच्या शिक्षणासाठी ते काम सोडून ते खर्डा येथे खडीमशीनवर राबू लागले. नितीन रयतच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकू लागला. शिक्षण घेता घेता तो एका मोटारसायकल गॅरेजमध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या अकाली जाण्याने आगे कुटुंब दु:ख सागरात अखंड बुडाले आहे.