आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Kidnapping, School Boy, Pune, Divya Marathi

श्रीगोंद्यातून शाळकरी मुलाचे भरदिवसा अपहरण,पुण्यातून नाट्यमय सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - शहरातील रोकडोबा चौकातून एका शाळकरी मुलाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. अपहरणकर्त्याच्या तावडीतून या मुलाने पुणे येथून सुटका करवून घेतली. श्रीगोंदे पोलिसांकडे या मुलाच्या पालकांनी या घटनेची खबर देऊनही कोणतीच कारवाई त्यांनी केली नसल्याचे मुलाच्या पालकांनी सांगितले.


इरशाद याकूब सय्यद (13, काष्टी, ता. श्रीगोंदे) असे या अपहृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो श्रीगोंद्यात आजीकडे राहत होता. रोकडोबा चौकातून तो विजय चौकाकडे मशिदीत प्रार्थनेसाठी जात असताना भरदुपारी त्याचे अपहरण करण्यात आले. मुलाने दिलेल्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या मारुती व्हॅनमधील दोघांनी रोकडोबा चौकाजवळ त्याच्या कानशिलात लगावली व व्हॅनमध्ये खेचले. तेथून ही व्हॅन अज्ञात दिशेने रवाना झाली. या गाडीला काळ्या काचा होत्या. तसेच खिडक्यांना आतून पडदे होते. मारहाणीमुळे निपचित पडून राहिलेल्या इरशादची वाहनातील चौघांनी झडती घेत खिसे तपासले. अपहरकर्त्यांच्या धाकाने इरशाद डोळे मिटून व जीव मुठीत धरून बसला होता. धाक दाखवण्यासाठी अपहरणकर्ते अधूनमधून त्यास मारहाण करीत होते.

आपसात ते दाक्षिणात्य भाषेत संभाषण करायचे. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी त्यास पुणे येथे नेले. स्वारगेटजवळ वाहनाला लॉक करून ते खाली उतरले असता इरशादने आतून दरवाजा उघडला व पळ काढला. भररस्त्याने तो जिवाच्या आकांताने पळत होता. तो पळत असलेला रस्ता कात्रजच्या दिशेने होता. तोपर्यंत इरशाद बेपत्ता झाल्याचे श्रीगोंद्यात कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनी श्रीगोंदे पोलिस ठाणे (शनिवारी 22 मार्च) गाठले. पोलिसांची कुमक शरद पवारांच्या सभेसाठी बंदोबस्तात असल्याने त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यानंतर इरशादने कात्रज येथील त्याच्या बहिणीचा पत्ता पादचार्‍यांना विचारला व त्यांचे घर गाठून हा किस्सा सांगितला. शनिवारी इरशाद श्रीगोंद्यात परतला. मात्र, पोलिस ठाण्यात कुटुबीयांची तक्रार कोणी दाखल करून घेतली नसल्याचे मुलांच्या पालकांनी सांगितले.