नगर- जितेंद्र भाटिया हत्याप्रकरणातील मारेकरी प्रदीप कोकाटे याला पिस्तूल पुरवणा-या विक्रम बेरडला पोलिसांनी तोफखाना ठाण्यातील गुन्ह्यात आरोपी केले आहे. रविवारी दाखल झालेल्या या गुन्ह्यात संदीप सुभाष सपाटे (27, नवरंग व्यायामशाळा) व सचिन अशोक सोनवणे (33, हिनापार्क, दगडी चाळ, नगर) या दोघांना न्यायालयाने 8 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
भाटियांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल प्रदीपने विक्रम ऊर्फ गोट्याकडून खरेदी केले होते.
गोट्याने ते संदीप सपाटे व सचिन सोनवणे यांच्याकडून विकत घेतले होते. त्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक करून वेगळा गुन्हा नोंदवला. या दोघांकडून आणखी एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्रदीप कोकाटे सध्या भाटिया हत्याप्रकरणी पोलिस कोठडीत आहे. नंतर त्याला तोफखान्यातील गुन्ह्यात वर्ग केले जाईल. तोफखान्यातील गुन्ह्यात आरोपी असलेला अमोल रणसिंग (सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता) हा अद्याप फरार आहे. संदीप सपाटे व सचिन सोनवणेकडे सापडलेले पिस्तूल त्यांनी कोणाकडून विकत घेतले याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सहायक निरीक्षक संजय गोगावले यांनी केली. त्यानुसार मुख्य न्यायदंडाधिका-यांनी दोघांनाही 8 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.