आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Theft Catch By Police, Divya Marathi

नागरिकांच्या मदतीने पकडले चोरट्याला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- किराणा दुकानात चोरी केल्यानंतर रोहित्राची चोरी करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या चोरट्याला नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून पकडले. चोराचे इतर चार साथीदार मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे गुरुवारी (27 मार्च) ही घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

वांबोरीतील खडांबा नाका चौकात अनिल मोहनलाल बोथरा यांचे किराणा दुकान आहे. आठवडाभरापूर्वी या दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर पुन्हा गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास चोरट्यांनी पहार व ज्ॉकच्या मदतीने दुकानाचे शटर उघडून चोरी केली. दुकानातील मालासह सुमारे पंधरा हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. नंतर त्यांनी आपला मोर्चा गुंजाळे फीडरवरील खोलेश्वर रोहित्राकडे वळवला. साडेबाराच्या सुमारास चोरट्यांनी वीजपुरवठा खंडित करून खांबावरून रोहित्र खाली उतरवले. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी महावितरणशी संपर्क साधून वीजपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. त्यानुसार महावितरणचे कर्मचारी तातडीने दुरुस्तीसाठी रोहित्राजवळ पोहोचले. त्यावेळी पोलिसांचीही गस्त सुरू होती. संशय आल्याने पोलिसही तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. पोलिस कर्मचारी रमेश चौधरी यांनी चोरट्यांचा पाठलाग करत सुनील जितसिंग जुनी (18) याला पकडले. त्याचे इतर साथीदार मात्र पळून गेले. त्यापैकी एक साथीदार पिंपळगाव माळवी येथील असून त्याचे नाव रोहिल्या असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित्रात दडलंय काय ?
तांब्याचा भाव सध्या हजार रुपये किलो आहे. 100 केव्ही रोहित्रामध्ये सुमारे 80 ते 90 किलो तांबे व सुमारे 200 लिटर इन्शुलेटिव्ह ऑईल असते. एका रोहित्राची चोरी केल्यास चोरट्यांना तांबे विकून वीस ते तीस हजार रुपये मिळतात. कोणतेही संरक्षण नसल्याने रोहित्र चोरीचे प्रकार वाढले आहेत.