आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Theft In Nagar, Divya Marati

पाच लाखांची रोकड लांबवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- चारचाकी वाहनाचा धक्का लागून तरुण जखमी झाल्याचा बनाव करत कांदा व्यापार्‍याच्या कारमधील पाच लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत वर्दळीच्या रस्त्यावर घडली. वाहनाच्या दरवाज्याच्या खिडकीची काच फोडून रोकड लांबवणार्‍या चोरट्यांचा पोलिसांना माग लागू शकला नाही.

पाच लाखांची रोकड लंपास होऊनदेखील संबंधित व्यापार्‍याने पोलिस ठाण्यात फिर्याद न नोंदवता आपल्या वाहनचालकाला फिर्याद देण्यास सांगितल्याने संबंधित व्यापार्‍याचे नाव पोलिसांनी दिले नाही. शनिवारी संबंधित व्यापार्‍याने नवीन नगर रस्त्यावरील एचडीएफसी बँकेतून पाच लाखांची रोकड काढली होती. ही रोकड आपल्या कारमधील पुढच्या सीटवर चालकाशेजारी ठेवण्यात आली होती. आठवडे बाजार असल्याने व नगर रस्त्यावर मोठी वर्दळ असल्याने सावकाश संबंधित वाहनाच्या चालकाने वाहन जाणता राजा मैदानावर आणले असता दुपारी बाराच्या सुमारास पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्याला रोखले.

वाहनाचा धक्का लागून मोटारसायकलस्वाराला अपघात झाल्याचे सांगत त्याला वाहनातून खाली उतरण्यास भाग पाडले व त्याच्याशी हुज्जत घालत त्याला काही अंतरावर नेले. दरम्यान, चोरट्याच्या सहकार्‍याने हीच संधी साधत कारच्या खिडकीची काच फोडत सीटवर ठेवलेली पाच लाखांची रोकड लांबवली. हा प्रकार लक्षात येताच चालकाने त्याच्याकडे झेप घेण्यापूर्वीच अपघाताचा बनाव करणारे आधीचे चोरटे व रोकड लांबवणारा मोटारसायकलवरून पसार झाले. सिनेस्टाइलने घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा कारभार ‘रामभरोसे’
संगमनेर शहर, संगमनेर तालुका व घारगाव या तीन पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने सध्या या पोलिस ठाण्यांत अधिकारी नाहीत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी मोठी घटना आहे. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून करून मृतदेह जाळण्याचा, तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच लाखांची रोकड लांबवण्याची घटना घडल्याने सध्या ही पोलिस ठाणी रामभरोसे सुरू आहेत.