आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi,sharpshooter Pradip Kokate Catch By Police, Divya Marathi

शार्पशूटर प्रदीप कोकाटेला 7 मेपर्यंत पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गंजबाजारातील व्यापारी जितेंद्र भाटिया यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या शार्पशूटरच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी आवळल्या. प्रदीप ऊर्फ शप्पू जनार्दन कोकाटे (24, डॉ. करंदीकर हॉस्पिटलजवळ, सिद्धार्थनगर) असे त्याचे नाव आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल व 10 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. शुक्रवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 मेपर्यंत पोलिस कोठडी दिली.
28 एप्रिलच्या रात्री व्यापारी भाटिया (33, सोनानगर, सावेडी) यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. तत्पूर्वी त्यांचे बंधू शंकर यांच्या मोबाइल व घरच्या फोनवर 30 लाखांच्या खंडणीसाठी धमक्या आल्या होत्या. जितेंद्र यांचा खून झाल्यानंतरही शंकर यांना धमकीचे फोन व संदेश येतच होते. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 9 शोधपथके तैनात करण्यात आली होती.
पोलिस निरीक्षक लक्ष्मण काळे, बाळकृष्ण हनपुडे, सहायक निरीक्षक किरणकुमार बकाले, विश्वास निंबाळकर, सुनील टोणपे, राहुल गायकवाड, राजेंद्र पगार, जितेंद्रकुमार परदेशी, बेहेरानी, जाधव व जिल्ह्यातील निवडक पोलिस कर्मचारी पथकात होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक ढेकणे यांनी दिलेल्या अधिकारी व गुन्हेगारांची माहिती असलेल्या कर्मचार्‍यांच्या मदतीने तपास करण्यात आला. गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले. आरोपी नगरमध्ये असल्याची निश्चित माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार व आरोपीच्या वर्णनावरून दिल्लीगेट, बालिकार्शम, सिद्धार्थनगर, सावेडी परिसरात साध्या वेशात अधिकारी व कर्मचारी पाठवून सातत्याने आरोपीचा शोध घेण्यात येत होता. 1 मे रोजी आरोपी सकाळी अण्णा भाऊ साठे चौकात येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार निरीक्षक ढेकणे, पोलिस राकेश खेडकर, मन्सूर सय्यद, जोसेफ साळवी, प्रसाद भिंगारदिवे, उमेश खेडकर, एकनाथ आव्हाड, संपत खैरे, सचिन जाधव, दिगंबर कारखेले, राहुल हुसळे यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
अशा आवळल्या मुसक्या
1 मे रोजी सकाळी सातच्या सुमारास प्रदीप कोकाटे अण्णा भाऊ साठे चौकात येताच पोलिस त्याला पकडायला सरसावले. त्याने पळण्याचा प्रयत्न करताच राकेश खेडकर, उमेश खेडकर व सचिन जाधव यांनी चपळाईने पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडे 2 मोबाइल व सीमकार्ड मिळाले. भाटिया कुटुंबीयांना ज्या क्रमांकावरून धमकीचे फोन व संदेश येत होते, हे तेच सीमकार्ड असल्याचे स्पष्ट झाले. प्रदीपने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या घरातून गावठी पिस्तूल व 10 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
खुनाचे कारण वेगळेच
जितेंद्र भाटिया यांचा खून खंडणीसाठी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. परंतु पकडलेल्या शार्पशूटरकडे प्रथमदर्शनी केलेली विचारपूस आणि त्यावरून दिसून येत असलेली गुन्ह्याची व्याप्ती यावरून हा खून करण्यासाठी कट रचण्यात आल्याचे स्पष्ट आहे. या कटात इतर आरोपीही सामील आहेत. खुनाचा उद्देश खंडणी नसून इतर उद्देशानेच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. या गुन्ह्याचा उद्देश व कटात सामील झालेल्या आरोपींची नावे निष्पन्न करून संबंधितांना अटक करण्यासाठी आता शहर पोलिस प्रयत्नशील आहेत.