आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी महिलेला मिळेना न्याय... प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- एमआयडीसीतील कंपनी सुटल्यावर घरी जाण्याच्या गडबडीत असताना सीमा कांबळे यांच्यावर एका दारुड्याने १० फेब्रुवारीला प्राणघातक हल्ला केला. प्रतिकार करताना त्या जबर जखमी झाल्या. जमावाच्या मारहाणीमुळे जिल्हा रुग्णालयात दाखल झालेला आरोपी अवघ्या दोन तासांत तेथून पळाला. तो अद्याप फरारी आहे. संबंधित महिला दलित समाजाची आहे. मात्र, तरीही पोलिसांना त्याचे गांभीर्य नाही, असे स्पष्ट झाले आहे.

आरोपी एमआयडीसीतील एल ब्लॉकमधील आयकॉन कंपनीतील आहे. संबंधित महिलेचे नातेवाईक एमआयडीसी पोलिसांकडे गेले, तर त्यांना कंपनीच आरोपीला हजर करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ते कधी याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. उलट आयकॉन कंपनीतील काही लोकांनी महिलेच्या वडिलांकडे जाऊन ‘प्रकरण मिटवून घ्या’ असे म्हणत त्यांना चार हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला, असे सीमा यांचे वडील गंगाधर ठाणगे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना ओडिशात जावे लागणार आहे, पण त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या परवानगीची गरज आहे. ती मिळाल्याने काहीच कारवाई झाल्याची माहिती समजली.

हल्ला झालेली महिला प्रकृतीने अशक्त, तसेच गरीब दलित कुटुंबातील आहे. दहा फेब्रुवारीला एमआयडीसीतील जेट कन्सल्टन्सी या कंपनीतून साडेपाचला सीमा निघाल्या. कंपनीपासून वखार महामंडळाच्या गोदामाच्या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजू वेड्याबाभळींनी व्यापल्या आहेत. त्यातून एक धटिंगण अचानक बाहेर आला काही कळायचा आत त्याने सीमा यांच्या पाठीवर पाइपचा फटका मारला. दुसरा फटका त्यांच्या डोक्यात मारला. तो वाचवण्यासाठी त्यांनी आपला हात पर्स आडवी धरली. त्या धटिंगणाने त्या स्थितीत आणखी एक फटका मारला. तो अडवताना प्रतिकार करताना सीमा यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावेळी अनेक कंपन्या सुटलेल्या असल्याने कामगार घरी निघाले होते. अनेक जणांसमोर हा प्रकार घडत असताना ते तेथून निघून गेले. पण, आरडाओरडा एेकून काहींनी मात्र घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला २५-३० लोकांचा घेरा पडला. त्याही स्थितीत त्याने प्रतिकार करून तो तोडण्याचा प्रयत्न केला. पण, जमावाने त्याला चोप दिला.

आरोपी बेशुद्ध झाल्याचे सोंग करून गुपचूप पडून राहिला. कोणीतरी फोन करून रुग्णवाहिका बोलवली. त्यातून त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्याला मुद्दाम संसर्गजन्य रुग्णांच्या कक्षात दाखल करण्यात आले. तेथून संधी मिळताच बेडच्या वरच्या बाजूस असलेल्या खिडकीची डासप्रतिबंधक जाळी उचकटून त्याने दोन तासांत पळ काढला. जखमी सीमा यांना वॉर्ड क्र. १२ मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताला सहा टाके पडले होते. जिल्हा रुग्णालयात सहा दिवस उपचार घेतल्यावर त्यांचा मार गंभीर असल्याने पुन्हा एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना पुन्हा तीन दिवस उपचार घ्यावे लागले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असले, तरी त्यांना औषधे घ्यावी लागत आहेत.

आरोपीच्याशोधास उशीर
रुग्णालयात दाखल केल्यावर आरोपीने आपले नाव उत्तमकुमार नाईक असे सांगितले होते. तशी नोंदही जिल्हा रुग्णालयात आहे. त्याला रुग्णालयात त्याची दाखल करण्याची वेळ रात्री आठ, तर पळून जाण्याची नोंदवली गेलेली वेळ दहा वाजताची आहे. त्याची फक्त दारू प्यालेला म्हणून नोंद करून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वास्तविक पाहता त्याने महिलेला मारहाण केली होती. त्याची कोणतीही नोंद घेण्यात आली नाही. त्याचा पत्ता फक्त एमआयडीसी असा आहे. इतक्या नोंदींवर पोलिस गप्प कसे बसले, या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. विशेष म्हणजे घटनेच्या दुसऱ्या दिवशी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेलेल्या कांबळे कुटुंबीयांना पोलिसांनी तुम्ही कशाला तक्रार करता? आरोपी कोमात आहे. तो जवळ जवळ मेल्यातच जमा आहे. तो मेल्यास त्यात तुमचेच नाव येईल, अशा शब्दांत भीती दाखवून फसवून तक्रार घेण्याचे टाळले. त्यानंतर मात्र ‘दिव्य मराठी’त याबद्दल वृत्त प्रसिद्ध होताच पोलिसांनी सीमा यांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल केला. त्याला आता दोन महिने उलटले, तरी पोलिसांना आरोपी सापडलेला नाही.

एमआयडीसीत प्रचंड गुन्हेगारी
पोलिसांच्या असंवेदनशील वृत्तीमुळे एमआयडीसीत गुन्हेगारी वाढली आहे. सीमा कांबळे यांच्या विनाकारण हल्ला, ही एक प्रवृत्ती आहे. या आधीही एका दोन वर्षांपूर्वी एका महिला कामगाराला भरदिवसा चाकू दाखवून तिच्याकडील ऐवज लुटण्यात आला. त्याबाबत कोणतीही कारवाई झाल्याने महिला कामगार वर्गात भीतीचे वातावरण आहे.

शिक्षा होणे आवश्यक
महिलेवर प्राणघातकहल्ला होण्याच्या या प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी होण्याची गरज आहे. दोन महिने उलटून गेले, तरी पोलिसांना आरोपी सापडत नाही. एमआयडीसीत महिला कामगारांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे आरोपीला पकडून जबर शिक्षा होणे आवश्यक आहे.'' जयेश देवळालीकर, उद्योजक.

कामगार असुरक्षित
एमआयडीसीत चोऱ्यांचे मोठे सत्र सध्या सुरू आहे. त्यामुळे उद्योजक त्रस्त आहेत. एका उद्योजकाला हाडे तुटेपर्यंत मारहाण करण्यात आली. संबंधित आरोपीने सीमा कांबळे यांच्याआधी दोन महिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समजली, तरीही पोलिसांनी कांबळे यांच्याकडे दुर्लक्ष केले.

दलितांना न्याय नाही
माझ्यामुलीवर दोन महिन्यांपूर्वी विनाकारण प्राणघातक हल्ला झाला. उपचारांसाठी पन्नास हजार खर्च करावा लागला. ती दोन दिवसांपासून कामावर जात आहे, पण तिला पाठीला पट्टा बांधावा लागतो. आम्ही दलित असल्यामुळे न्याय मिळत नसल्याची आमची भावना झाली आहे.'' गंगाधर ठाणगे, सीमाकांबळे यांचे वडील.