आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे फुटले त्या खुनाचे बिंग, नगरमधील प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील चाैघांना जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अशोक लांडे खून खटल्यात प्रतिष्ठित राजकीय वलय असलेल्या एकाच कुटुंबातील चाैघांना जन्मठेपेची शिक्षा लागली. हा नगर शहर परिसरात बोकाळलेल्या गुंडगिरी, भीती, दादागिरी याविरुद्ध सर्वसामान्यांनी उठवलेल्या निर्भिड आवाजाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया या खटल्यातील मूळ फिर्यादी शंकरराव राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आरोपींना शिक्षा लागावी म्हणून पोलिसांसह न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमांनीही मोलाची भूमिका बजावली, अशी प्रांजळ कृतज्ञता राऊत यांनी व्यक्त केली. यावेळी मिलिंद मोभारकर, पार्वतीबाई राऊत अमोल जाधव उपस्थित होते.

राऊत म्हणाले, नगर शहर परिसरात आजवर अनेक हत्याकांडे झाली. पण पोलिसांच्या रेकॉर्डवर हे गुन्हे कधी आलेच नाहीत. अनेकदा राजकीय वलय असलेले आरोपी तपास यंत्रणेवर दबाव टाकतात. फिर्यादींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करतात. साक्षीदारांना आमिषे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु अशोक लांडे खून खटल्यात सत्याचा विजय झाला. फितूर वगळता इतर सर्व साक्षीदार, तपासी अधिकारी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत करणारे पोलिस अधिकारी यांच्यामुळे खटला लढण्यास बळ मिळाले. या हत्याकांडाच्या निकालामुळे राजकीय लोकांनाही जरब बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरोपी भानुदास कोतकर यांचा जामीन रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात बाजू लढवणाऱ्या अॅड. अनिलकुमार पाटील, जितेंद्र गायकवाड, सर्वोच्च न्यायालयातील अॅड. शशिभूषण आडगावकर यांचे त्यांनी आभार मानले.

याशिवाय औरंगाबाद खंडपीठातील अॅड. नारायण नरवडे, नाशिकच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे बाजू मांडणारे अॅड. सुधीर कोतवाल यांना राऊत यांनी या खटल्याचे शिल्पकार म्हणून कौतुक केले. या खटल्यात वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश, तत्कालीन तपासी अधिकारी ज्योतिप्रिया सिंग, माजी पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, लखमी गौतम, सध्याचे पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, तत्कालीन उपअधीक्षक श्याम घुगे, यादवराव पाटील, बजरंग बनसोडे, आनंद भोईटे, पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर, एटी पवार, विजयसिंह पवार, बाळकृष्ण हनपुडे यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचे राऊत यांनी विशेष आभार व्यक्त केले.

मोभारकरांनी दिली साथ
अशोकलांडे खून खटल्यात सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. त्यांनी एकूण पंचनाम्यांवर स्वाक्षऱ्या केल्या. या खटल्यात त्यांनीही मोलाची भूमिका बजावली. मोभारकर यांनी नाशिकच्या न्यायालयात आपली साक्ष नोंदवली होती. त्यानंतर काही दिवसांनी मोभारकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. हा हल्ला लांडे खून प्रकरणात त्यांनी महत्त्वाची साक्ष बजावल्यामुळेच झाल्याचा पोलिसांनाही दाट संशय होता. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असून तपास सुरु आहे. दरम्यान, सोमवारी लांडे खून खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार शिवाजी कर्डिले यांचा या प्रकरणात पुरावे नष्ट करण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पुढीस स्लाइड्सवर वाचा, कसे फुटले खुनाचे बिंग, न्यायालयातही खटला खूप गाजला हा खटला