आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहविक्रय व्यवसायावर पोलिसांनी घातला छापा, पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर-पुणे रोडवरील चास गावाच्या शिवारातील माैर्य हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रय करणाऱ्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी हॉटेलमालकासह सहा जणांविरुद्ध पिटा कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परीविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या पथकाने गुरुवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

मौर्य हॉटेलमध्ये अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी छाप्याचे नियोजन केले. या छाप्यात सावेडीतील वैदुवाडी, केडगाव गावठाणसह मूळच्या मुंबईतील सध्या मौर्य हॉटेलमध्ये राहणाऱ्या पाच महिलांची सुटका करण्यात आली. हॉटेल मालक अशोक माणिकलाल कर्डिले, शुभम विजय कर्डिले (दोघे रा. खंडाळा, ता. नगर), मॅनेजर रमेश दाईतारी राऊत (३४, रा. सुपा, ता. पारनेर), राहुल अशोक काळोखे (२४) विशाल बाळासाहेब ठुबे (२२, दोघेही रा. कांबळे मळा, केडगाव) मोबीन बिलाल शेख (१९, रा. कडा बाजारतळ, आष्टी, जि. बीड) यांच्याविरुद्ध पोलिसांनी पिटा कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी या छाप्यात हॉटेलमधून अडीच हजार रुपयांची रोकड, सुमारे सहा हजार रुपये किमतीची विदेशी दारूही जप्त केली आहे. या गुन्ह्यात अशोक शुभम कर्डिले हे दोघे फरार असून इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक विशाल आनंद हे करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी देहविक्रय करण्याचा व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे. या व्यवसायाावर पाेलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...