आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाची नोकरी सोडून बनवली टोळी, घरफोड्या करणारे जेरबंद, 'एलसीबी'ची कामगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- समाजाने आणि पोलिसांनी गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या समूहात तो जन्माला आला, यात त्याची काहीही चूक नव्हती. पुढे त्याने शिक्षणही घेतले, नोकरीच्या चांगल्या संधीही त्याला उपलब्ध झाल्या, पण ज्या समाजात तो राहिला, वाढला, त्याच समाजातील इतर साथीदारांचा मार्ग त्याने निवडला अन् तिथेच तो चुकला. सहा वर्षांपूर्वी पोलिस दलात चक्क शिपाई म्हणून भरती झालेला असतानाही त्याने पंधरा दिवसांत नोकरी सोडली आणि मित्र, नातेवाईकांसोबत स्वत:ची चोऱ्या, घरफोड्या करणारी टोळी तयार केली. गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या अन् त्याने आजवर केलेल्या गुन्ह्यांना वाचा फुटली.
रायल जयसिंग काळे (पोखर्डी मळा, ता. नगर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सुनील अत्तश्या भोसले (डोळस वस्ती, शिंगवे, ता. नगर), नितीन जयसिंग काळे (पोखर्डी मळा, ता. नगर) एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोखर्डी शिवारात असलेल्या मिरावलीबाबा पहाडाच्या पायथ्याला पाठलाग करून पकडले. आरोपी तेथे लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपींना पाठलाग करून पकडण्यात आले. सुरुवातीला पोलिसांच्या प्रश्नांना आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसी खाक्या दिसताच आतापर्यंत केलेल्या घरफोड्यांची कबुली दिली.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या पथकातील उपनिरीक्षक संजयकुमार सोने, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, तानाजी हिंगडे, भागिनाथ पंचमुख, जितू गायकवाड, विजय सिद्धार्थ धनेधर, रोहिदास नवगिरे, मच्छिंद्र बर्डे, विनोद मासाळकर, चालक सचिन कोळेकर यांनी कामगिरी केली. आरोपींच्या ताब्यातून सुमारे लाख २९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले. त्यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात ३, तर एमआयडीसी पोलिस ठाण्यात घरफोडी जबरी चोरीच्या एका गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे अधिक तपासासाठी त्यांना तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

या आरोपींनी काही आठवड्यांपूर्वी भिस्तबाग महालाजवळ एका घराचा पत्रा उचकटून सोन्याचे दागिने चोरले होते. नंतर पाइपलाइन रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये घुसून घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. नंतर आतील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने चोरले. बोल्हेगावातील एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने रोकड चोरल्याचेही त्यांनी सांगितले. पोखर्डी शिवारातील काळामाथा येथे एका महिलेला याच आरोपींनी चाकूचा धाक दाखवला. तिचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली. त्यांचे इतर साथीदार असल्याचाही संशय असल्याने अधिक तपास सुरु आहे.
रायल काळे

शिक्षित तरीही चुकली वाट
रायलकाळेने बारावीनंतर पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. हे करत असतानाच त्याने पोलिस भरतीची प्रक्रिया पार केली. शिपाई म्हणून भरती होऊन अवघे पंधरा दिवसच तो पोलिस दलात रमला. त्याचा भाऊ नितीन काळे हाही शिकलेला आहे. शिवाय पोलिसांनी पकडलेल्या त्याच्या अल्पवयीन मुलानेही नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली आहे. एकूणच ज्या समूहातून रायल काळे आला त्यापैकी त्याचे बहुतांश नातेवाईक बऱ्यापैकी शिक्षण घेतलेले आहेत, तरीही पोटापाण्यासाठी नोकरी करण्याचा किंवा चांगले काम करण्याचा मार्ग त्यांनी निवडला नाही. त्याऐवजी स्वत:ची टोळी करून अखेर गुन्हेगारीचाच रस्ता निवडला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

परंपरागत रस्ताच धरला
नगरमध्येपदवीचे शिक्षण घेत असताना रायल काळे नोकरीच्या शोधात होता. जिल्ह्यात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवून गेलेले तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या विशिष्ट समूहातील युवक-युवतींसाठी पोलिस भरतीचे आयोजन केले होते. भरतीच्या विहित चाचण्यांमध्ये पात्र ठरल्यानंतर बहुतांश युवक-युवती पोलिस दलात दाखल झाले. रायलही पोलिस शिपाई म्हणून भरतीत पात्र ठरला. पण ज्या समाजातून तो आला होता, त्या लोकांनी त्याची खिल्ली उडवली. कुणी टोमणे मारले. या नोकरीमुळे भविष्यात कुटुंबीयांना धोका नको, म्हणून त्याने पोलिसाची नोकरीच सोडून दिली अन् गुन्हेगारीचाच रस्ता निवडला.