आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जतमध्‍ये दरोडेखोरांच्या टोळीस मुद्देमालासह अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात दरोडे, लूटमार करून धुमाकूळ घालणार्‍या व दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला नगर-सोलापूर राज्य मार्गावर रविवारी दुपारी दोन वाजता कर्जतचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले. आरोपींमध्ये विक्रम शिंदे (30), सुरेश शिंदे (35), उत्तम शिंदे (25) व नाना शिंदे (55, सर्व नांदूर गायरान, ता. केज, जि. बीड), चंदू पवार (55), बाळू पवार (25) व नाना पवार (19, तिघे पाटेगाव, ता. कर्जत) व अरुण काळे (21, जामखेड) यांचा समावेश आहे.

शनिवारी मध्यरात्री कर्जतचे पोलिस निरीक्षक ढोकले यांना नगर-सोलापूर रस्त्यावर पाटेवाडी शिवारात दरोडेखोरांची टोळी लपल्याची माहिती मिळाली. ढोकले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मणराव राख, आर. जी. सोनवणे, ए. टी. पोटे, डी. बी. जाधव, जी. डी. इंगावले, एम. पी. पांढारकर, ए. एस. खोमणे, सतीश सोनमाळी, अफसर पठाण यांचे पथक घटनास्थळी खासगी वाहनातून गेले. या पथकाने छापा टाकून दबा धरून बसलेल्या टोळीला हत्यार व मुद्देमालासह पकडले. या दरोडेखोरांकडे कोयता, विळा, मिरचीची पूड, गज तसेच दोन टीव्ही, दोन मोटारसायकली (एमएच 23 जी 9897) व (एमएच 17 जे 4092) सापडल्या. आरोपीतील विक्रम शिंदे याच्यावर मराठवाड्यामध्ये व बीड जिल्ह्यात विविध 36 गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ सुरेशविरुद्ध 21, तर उत्तम याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. हे सर्व आरोपी फरारी घोषित करण्यात आले होते. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.