आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminal In Awade Hospital Custody At Ahmednagar

आरोपींना आवडे रुग्णालयातील कोठडी; नियुक्तीचे पोलिसच मदत करत असल्याची चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली जिल्हा सरकारी रुग्णालयातील पोलिस कोठडीत विनाकारण दाखल होऊन आरोपीने पलायन करण्याचा प्रयत्न नवा नाही. येथे नियुक्त असलेल्या पोलिसांना चिरीमिरी दिली की, सर्व ‘लाड’ पूर्ण होतात. हेही आरोपींना चांगले माहिती आहे. आतापर्यंतच्या विविध घटनांमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील पोलिस कोठडी आवडे आरोपींना या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

आजारी कैद्यांना ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडी आहे. शनिवारी (21 सप्टेंबर) दुपारी या कोठडीतील आरोपी ज्ञानेश्वर मोहन घायतडक (वय 35, पाथर्डी) हा पोलिसांनाच कोठडीत कोंडून पळाला. त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असले, तरी या घटनेमुळे रुग्णालयातील पोलिस कोठडीच्या सुरक्षाव्यवस्थेला पुन्हा एकदा तडे गेले. या कोठडीत यापूर्वीही असे प्रकार बर्‍याचदा घडले असल्यामुळे ही कोठडी चर्चेचा विषय ठरली आहे. सर्व ‘सोयी’ सहजपणे मिळत असल्याने आरोपी आजाराचा बहाणा करून येथे दाखल होतात. येथे नियुक्त असलेल्या पोलिसांशी आर्थिक संबंध प्रस्थापित करून इतर सोयीही उपलब्ध करून घेतात, अशी चर्चा आहे.

जिल्हा रुग्णालयात असलेल्या वैद्यकीय कोठडीत दाखल होणारे आरोपी पोलिसांना पैशांचे आमिष दाखवतात. पोलिसही त्याला बळी पडून सुखसोयींची सर्व साधने त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. कोठडीतील आरोपींना जेवण देण्यासाठी लोक कोठडीपर्यंत जातात. त्यांच्यामार्फत मोबाइल, मिरचीची पूड, नशेची साधने, सिगारेट, गुटखा अशा वस्तू आता जातात. हे प्रकार अनेकदा उजेडात आले आहेत. आजारपणाचे नाटक केलेले कैदी येथे कोणाच्या मदतीने येतात व त्यांना सवलती देणार्‍या पोलिसांवर कडक कारवाई होणार का, हा प्रश्न आहे.

कोठडीला कडेकोट सुरक्षा हवी
रुग्णालयातील कोठडीतून आरोपींनी पलायन करण्याचे प्रकार बरेचदा घडले असले, तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी आतापर्यंत यातून धडा घेतलेला नाही. कोठडीसमोर असलेल्या जाळीऐवजी चार फुटी भिंत बांधण्याचा व बाहेरील बाजूस असलेल्या खिडक्यांना डबल गजांबरोबर जाळ्या बसवण्याचा निर्णय झाला, पण सुरक्षा कडक झाली नाही. पलायनाचा प्रकार झाल्यानंतर वरिष्ठ कोठडीची पाहणी करतात. नंतर झाल्या प्रकाराचा विसर पडतो.

‘त्यांचे’ निलंबन अटळच
रुग्णालयाच्या कोठडीतून आरोपींच्या पलायनाचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. कोठडीत नियुक्तीला असलेल्या पोलिसांनी कडक पहारा केला, तर आरोपींना पलायन करणे अशक्य आहे, परंतु तसे होत नाही. म्हणूनच घायतडक शनिवारी दुपारी पळाला. तोफखान्यातील वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी या कोठडीला भेट देऊन पाहणी करतात. पण, तरीही त्याचा फारसा उपयोग होत नाही. शनिवारच्या प्रकरणात नेमणुकीला असलेल्या चार पोलिसांचे निलंबन अटळ आहे.’’ -श्याम घुगे, उपअधीक्षक, शहर विभाग

पोलिसांची आरोपींना मदत
डिसेंबर 2011 मध्ये कैलास हिंदुराव सावंत (शेरा, ता. सातारा) या दरोडेखोराने रुग्णालयातील कोठडीतून पलायन केले होते. संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे गोदाम फोडणार्‍यांत सावंत होता. त्याचे नातेवाईक नगरमध्ये होते. बंदोबस्ताला असलेल्या साळे नावाच्या पोलिसाशी त्याने मैत्री वाढवली. साळेने एकदा उपचारासाठी सावंतला बाहेर काढले. ती संधी साधून सावंत पळाला व नातेवाइकांकडे गेला. नंतर स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला.

कोठडीत हेक्सा ब्लेड
फेब्रुवारी 2010 मध्ये जिल्हा रुग्णालयातील पोलिस कोठडीतून चार आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला होता. कोठडीच्या खिडकीचे लोखंडी जाळी व गज त्यांनी हेक्साने कापले. मुख्यालयातील पोलिस कर्मचार्‍याच्या दक्षतेमुळे आरोपींचा हा प्रयत्न फसला. संजू पुंजाहारी माळी (औरंगपूर, ता. राहाता), गोरख गणपत पुजारी (बेलापूर, ता. र्शीरामपूर), विजय हिरामण गव्हाणे (राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) व अनिल गुलाब यशवंते (र्शीरामपूर) या चौघांकडे जाळी व गज कापण्यासाठी हेक्सा ब्लेड मिळाले होते.

मिरचीची पूड आली कशी?
मार्च 2011 मध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मतीन शेख याने या कोठडीतून पळण्याचा प्रयत्न केला होता. पळताना त्याने पोलिसाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली होती. पोलिसाचा आरडाओरडा ऐकून सुरक्षारक्षकांनी मतीनला पकडले. शरीरयष्टीने पैलवान असलेला मतीन आधी कोणाला आवरला नाही. पण नंतर त्याच्या मुसक्या आवळल्या अन् ड्युटीवरील पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण कोठडीत मिरचीची पूड कशी पोहोचली, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला.

घायतडकवाडीत पकडले ज्ञानेश्वरला
पाथर्डी- जिल्हा शासकीय रुग्णालयातून पळालेला ज्ञानेश्वर मोहन घायतडक या आरोपीला पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. हत्यारबंद असलेल्या घायतडकविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयातून पळालेला ज्ञानेश्वर पाथर्डी तालुक्यातील घायतडकवाडी येथे मूळ गावी गेला होता.

सख्ख्या भावाचा खून करणारा ज्ञानेश्वर शनिवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील कोठडीत पोलिसांनाच कोंडून पळाला होता. त्याला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले होते. पळाल्यानंतर ज्ञानेश्वर नगरहून कच्च्या रस्त्याने पायी चालत वांबोरीकडे गेला. तेथून पांढरीपुलावर येऊन मिरी-तिसगाव-पाथर्डी हा प्रवास त्याने खासगी वाहनातून केला. रविवारी सकाळी तो घायतडकवाडी गावात पोहोचला. गुप्त खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक अशोक आमले, सहायक निरीक्षक इंद्रभान सरोदे, बाळासाहेब घुगरकर, संजय आव्हाड, काका राख, धर्मराज दहिफळे, सचिन साप्ते, सोमनाथ सोनटक्के, अतुल शेळके यांनी घायतडकवाडी शिवारात सापळा रचला. बिस्किटाचे पुडे घेऊन ज्ञानेश्वर गावाबाहेर पायी चालला होता. दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले.