आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुंड पाप्या शेखचा कोर्टाच्या आवारात धिंगाणा ; जज, वकिलांना शिवीगाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिर्डीचा कुख्यात गुंड व सध्या ‘मोक्का’ कायद्यांतर्गत नाशिकच्या कारागृहात असलेला सलीम ख्वाजा शेख ऊर्फ पाप्या (36, शिर्डी) याने मंगळवारी दुपारी जिल्हा न्यायालयात धिंगाणा घातला. वकील, न्यायाधीश व पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण, तसेच पोलिसांची स्टेनगनही हिसकावण्याचा प्रयत्न त्याने केला. या गोंधळामुळे तीन तास न्यायालयाचे कामकाज वेठीला धरले गेले.
नाशिक मुख्यालयाच्या चार पोलिसांचे पथक पाप्या व त्याचा साथीदार विनोद सुभाष काळे (32, राहाता) याला घेऊन दुपारी जिल्हा न्यायालयात आले. सन 2012 मध्ये र्शीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे एलसीबी पथकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश आर. जे. वानखडे यांच्यासमोर सुरू असलेल्या सुनावणीसाठी या आरोपींना आणण्यात आले. दुपारी तीन वाजता पथक जिल्हा न्यायालयात आले. पाप्या नगरला आल्यापासूनच बरळत होता. साडेतीनच्या सुमारास आरोपी थांबवण्याच्या ठिकाणीच पाप्याने त्याचे वकीलपत्र घेतलेल्या वकिलाला शिवीगाळ केली. नगर व नाशिक पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवीगाळ करत त्याने वकील व काही पोलिसांवरही हात उचलला. संतापलेल्या वकिलांनी त्याच्यावर हल्ला केला. मारहाण सुरू असतानाच त्याने नाशिक पोलिसांच्या हातातील स्टेनगन हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत स्टेनगनची मॅगझिन त्याच्या हाती लागली.
पोलिसांनी कोतवाली पोलिसांना माहिती कळवली. सुरक्षेच्या कारणास्तव बेलिफ रूममध्ये पाप्या, त्याचा साथीदार व नाशिकहून आलेले चार पोलिसांचे पथक स्थानिक पोलिसांनी बंदिस्त केले. तोवर जिल्हा न्यायालयातील संतप्त वकिलांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी करत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. निरीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांनी रीतसर गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वकील ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आरोपी व त्याच्याबरोबर आलेल्या पोलिसांनी मद्यप्राशन केल्याचे वकिलांचे म्हणणे होते. पोलिस अधीक्षकांना बोलावून संबंधित पोलिस व आरोपींची वैद्यकीय तपासणी घटनास्थळीच करण्याची मागणी वकिलांकडून करण्यात आली. यावेळी वकिलांनी ‘दारुड्या पोलिसांचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी न्यायालय परिसर दणाणून सोडला. पाऊण तास हा प्रकार सुरू होता.
आरोपींसह पोलिसांची वैद्यकीय तपासणी
आरोपी पाप्या, विनोद जाधव, नाशिक मुख्यालयात नेमणुकीस असलेले हवालदार दिनकर लक्ष्मण पवार, पोलिस नाईक किसन आनंदा सोनकांबळे, राजेंद्र भगवान देवरे व शेखर देविदास पवार यांची सायंकाळी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संबंधितांनी मद्यप्राशन केले आहे का, याची पडताळणी करण्यासाठी ही तपासणी होती. बुधवारी (22 जानेवारी) या तपासणीचा अहवाल मिळण्याची शक्यता आहे.
वकील संघाचा आज बंद
वकील संघाने बुधवारी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे शहर वकील संघाचे अध्यक्ष अँड. शिवाजी कराळे यांनी जाहीर केले. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा न्यायाधीश आर. जे. वानखडे व ए. झेड. ख्वाजा यांच्याशी वकिलांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.