आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Criminal Rajendra Chopada Arrested At Ahmednagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजेंद्र चोपडा गजाआड, तलवारीचा धाक दाखवून मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: नगर तालुक्यातील चास शिवारात एका शेतकर्‍याच्या शेतात अनधिकृतपणे प्रवेश करून त्याला शिवीगाळ व दमदाटी केली, तसेच तलवारीचा धाक दाखवून पिस्तुलातून गोळी घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी राजेंद्र कांतीलाल चोपडा याच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. चोपडा हा आमदार शिवाजी कर्डिले यांचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जातो. त्याच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे.
सूर्यभान नांगरे हे सोमवारी (4 जून) दुपारी दोनच्या सुमारास चास शिवारातील त्यांच्या मालकीच्या गट नं. 202/2 या शेतात गेले. त्यावेळी राजेंद्र चोपडा, नीलेश सुभाष चोपडा, सुनील कांतीलाल भंडारी व दोन मजूर नांगरे यांच्या शेतात पूर्वेच्या बाजूला 20 फूट रुंदीचा रस्ता तयार करीत असल्याचे त्यांनी पाहिले. माझ्या जमिनीत कोणाला विचारून रस्ता तयार करता, अशी विचारणा नांगरे यांनी चोपडा व त्यांच्या साथीदारांकडे केली.
त्याचा राग येऊन राजेंद्र चोपडा, नीलेश चोपडा व सुनील भंडारी यांनी नांगरे यांना शिवीगाळ केली. तसेच गचांडी पकडून मारहाण केली. इथून निघून जा, नाहीतर पिस्तुलातून गोळी घालीन, अशी धमकीही त्यांनी दिली. राजेंद्र व नीलेश चोपडा यांनी गळ्याला तलवार लावून धाक दाखवला, अशी फिर्याद नांगरे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी सोमवारी सायंकाळी चोपडा व त्याच्या सहकार्‍यांविरुद्ध आर्म अँक्ट, धमकावल्याचा व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. नगर तालुका ठाण्याचे उपनिरीक्षक ए. एस. नरवडे यांनी रात्री उशिरा राजेंद्र चोपडाला ताब्यात घेतले. नीलेश चोपडा, सुनील भंडारी व इतर साथीदार मात्र फरार झाले आहेत. मंगळवारी दुपारी पोलिसांनी चोपडाला न्यायालयासमोर हजर केले. चोपडाने पिस्तूल कोठून घेतले, त्याचा परवाना आहे का याचा शोध घ्यायचा आहे, तसेच गुन्ह्यात वापरलेली तलवार हस्तगत करायची आहे, गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करायची आहे. त्यामुळे चोपडाला पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील ढगे यांनी केला. न्यायालयाने त्याला 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली.