आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crises Of City Chief Of BJP : Selection Declaring Soon

तिढा भाजप शहराध्‍यक्षपदाचा : निवडीची घोषणा जाहीर होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- प्रदेशाध्यक्षपदाची निवड जाहीर झाल्यानंतर आत भाजपच्या शहराध्यक्षपदाच्या निवडीला लवकरच मुहूर्त लाभेल असे दिसते. आगामी आठवड्यात शहराध्यक्षपदाची घोषणा होण्याची चिन्हे आहेत. पक्षातील ढाकणे व गांधी गटाकडून शहराध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भाजपची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासूनच सुरू आहे. जिल्ह्यातील 18 तालुका मंडल पदाधिकारी, शहराध्यक्ष व नंतर जिल्हाध्यक्षपदाची निवड होणार आहे. शहराध्यक्षपदासाठी खासदार दिलीप गांधी व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या गटातील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. विद्यमान शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांच्यासह जगन्नाथ निंबाळकर, अनिल गट्टाणी, सुनील रामदासी, नरेंद्र कुलकर्णी, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे हे शहराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. शहराध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी दोन बैठका घेऊनही उपयोग झाला नाही. शहराध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे काम पहात आहेत. त्यांनी निवडीसाठी बैठका घेतल्या. मात्र, एकाही नावावर मतैक्य न झाल्यामुळे या बैठका केवळ चहापाण्यापुरत्याच ठरल्या.

गंधे गेल्या तीन वर्षांपासून या पदावर आहेत. जिल्हा सरचिटणीस असलेले सुनील रामदासी यांनी या पदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. ते यापर्वी दोन वेळा शहराध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात पक्षवाढीचे कुठलेच काम झाले नाही. त्यामुळे त्यांच्या गळ्यात तिसर्‍यांदा शहराध्यक्षपदाची माळ पडण्याबाबत साशंकता आहे.

जगन्नाथ निंबाळकर हे या पदासाठी इच्छुक असले, तरी त्यांना पक्षातूनच विरोध आहे. अभय आगारकर यांनीही शहराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावली असली, तरी त्यांना शहराध्यक्षपदापेक्षा जिल्हाध्यक्षपदात जास्त रस आहे. पक्षातील जुने व निष्ठावंत कार्यकर्ते अनिल गट्टाणी यांनीही शहराध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर स्थानिक पदाधिकार्‍यांच्या निवडी होणार असल्याचे वरिष्ठांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. चार दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.लवकरच शहराध्यक्षपदाची घोषणा होईल. मात्र, शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल हे मात्र आठवड्याभरानंतर समजेल.

गटा-तटाच्या राजकारणात खासदार गांधी व माजी जिल्हाध्यक्ष ढाकणे यांच्यात शहरात कधीच मेळ बसला नाही. एकाच विषयावर दोन गटांचे वेगवेगळे मोर्चे नगरकरांना पहायला मिळाले.

पक्षांतर्गत निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यापासून या दोन्ही गटांनी शहराध्यक्षपद मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू केली आहे.दरम्यान शनिवारी नगरमध्ये आलेले भाजपचे लोकसभेतील उपनेते व खासदार गोपीनाथ मुंडे यांनीही स्थानिक पदाधिकारी निवडीबाबत कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांचा हिरमोड झाला.

भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे शनिवारी (13 एप्रिल) नगर दौर्‍यावर आले होते. हेलिपॅडवर त्यांचे खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले व राम शिंदे यांनी स्वागत केले. मात्र, मुंडे यांचे जवळचे सर्मथक असलेले माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे थोडे दूरच राहिले.

मुंडे यांनी दुपारचे जेवण माजी शहराध्यक्ष अभय आगरकर यांच्या घरी घेतले, तर रविवारी सकाळचा नाश्ता खासदार दिलीप गांधी यांच्या घरी केला. सकाळी मुंडे यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा केली, तरी शहराध्यक्ष निवडीबाबत मात्र कुठलीही चर्चा झाली नाही, असे सांगण्यात आले.
विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नगर शहराध्यक्षपदाची निवड होणार आहे. प्रथम 18 तालुका मंडल पदाधिकार्‍यांच्या निवडी होणार असून, नंतर शहराध्यक्षपदाची निवड केली जाईल. शहराध्यक्ष निवडीवरून पक्षामध्ये कुठलीही गटबाजी नाही.’’ राम शिंदे, जिल्हाध्यक्ष, भाजप
निष्ठावंताना संधी द्यावी
पक्षाचा मी सर्वात जुना कार्यकर्ता आहे. पक्षाने संधी दिली चांगले, नाही दिली तरी चांगले. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात मी सहभागी झालो आहे. पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम राहील. यापूर्वीच्या शहराध्यक्षांनी पक्षवाढीसाठी कुठलेही ठोस काम केले नाही. त्यामुळे शहराध्यक्षपद हे निष्ठावंतांना द्यावे. ’’ अनिल गट्टाणी, सरचिटणीस, जिल्हा संघटना