आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्यवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव - तालुक्यातील खरडगाव येथील कामगार भीमराज मच्छिंद्र लबडे यांचा मुलगा आदित्य (७) याच्या श्वासनलिका टॉन्सिलच्या शस्रक्रियेस येथील जनशक्ती श्रमिक संघाच्या प्रयत्नातून चाळीस हजारांची मदत मिळाली. या मदतीमुळेच आदित्यवर नेवासे येथे यशस्वी शस्रक्रिया झाली.
खरडगाव येथील लबडे हे इमारत क्षेत्रातील कामगार आहेत. त्यांची अार्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांचा मुलगा आदित्य यास श्वासनलिका टॉन्सिलचा त्रास होता. त्यांनी अनेक रुग्णालयांत त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अार्थिक खर्च अधिक असल्याने त्यांची कुचंबणा होत होती. अखेर त्यांनी जनशक्ती श्रमिक संघाशी संपर्क साधल्यावर संघटनेच्या विशेष प्रयत्नांतून नेवासे येथील समर्पण फाउंडेशनच्या डॉ. करण घुले हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली. संघटनेमार्फत कामगार विमा योजनेंतर्गत आदित्यच्या शस्रक्रियेसाठी चाळीस हजारांच्या रकमेची कॅशलेस विम्याची मदत मिळाली. त्यामुळे, आदित्यचे वडील भीमराज लबडे त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले. संघटनेचे मार्गदर्शक भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती माजी सभापती हर्षदा काकडे, जनशक्ती श्रमिक संघाचे अध्यक्ष प्रा. सोपान पुरनाळे, संघटक संजय दुधाडे, हमाल पंचायतीचे सचिव नंदू डहाणे आदींनी त्यासाठी परिश्रम घेतले.
नगर शहरातील पाठक हॉस्पिटल, सिटीकेअर हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल, झेंडे हॉस्पिटल (महिलांंचे आजार), कापसे आय क्लिनिक तसेच नेवासे येथील डॉ. करण घुले यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरातील काही रुग्णालयांत या योजनेंतर्गत कामगार विमा योजनेंतर्गत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना स्वतःच्या तसेच कुटुंबातील सहा सदस्यांच्या गंभीर आजारावरील उपचारासाठी दोन लाख खर्चाचा कॅशलेस आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी दरवर्षी संघटनेकडे कामगारांनी नोंदणीचे नूतनीकरण असणे गरजेचे असल्याने कामगारांनी दरवर्षी नूतनीकरण करावे, तसेच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
जनशक्ती श्रमिक संघामार्फत इमारत बांधकाम क्षेत्रातील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील सुमारे सात हजार कामगारांची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाद्वारे सर्व कामगार तसेच कुटुंबातील सहा जणांचा आरोग्य विमा योजनेत दि न्यू युनायटेड इन्शुरन्स कंपनीमार्फत प्रत्येकी दोन लाख रुपयांचा कॅशलेस आरोग्य विमा उतरवण्यात आलेला आहे.