आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रॉम्प्टन स्पर्धेसाठी वाडिया पार्कची खेळपट्टी सज्ज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - क्रॉम्प्टन करंडक स्पर्धेसाठी वाडिया पार्कचे मैदान सज्ज झाले आहे. सन 2003 नंतर पुन्हा एकदा वाडिया पार्कवर ही स्पर्धा खेळवली जात असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (17 जानेवारी) सकाळी 10 वाजता होणार आहे.
व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू असल्याने मागील 9 वर्षांपासून वाडिया पार्कचे मैदान क्रिकेटसाठी मिळतच नव्हते. वारंवार केलेली मागणी, आंदोलनाचे इशारे यामुळे प्रशासनाने यावर्षी क्रॉम्प्टन करंडक स्पर्धेसाठी हे मैदान दिले. मागील 11 दिवसांपासून मैदान तयार करण्याचे काम सुरू होते. रोलिंग करून मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले. मैदानाच्या मध्यभागी 12 गुणिले 100 फूट या आकाराची विकेट तयार करण्यात आली आहे. त्यातील 8 गुणिले 66 फूट हा भाग अ‍ॅक्च्युअल विकेटचा असेल. विकेट खोडून त्यात शास्त्रीय पद्धतीने पोयटा व मुरुमाचे थर टाकून पाणी मारून व रोलर फिरवून जमिनीच्या पातळीपेक्षा साधारण 2 इंच उंच अशीही विकेट आहे, अशी माहिती क्रॉम्प्टनचे भास्कर गायकवाड यांनी दिली. मागील काही वर्षे ही स्पर्धा नगर महाविद्यालयाच्या मैदानावर खेळवली जात होती. तेथील मैदान 5 दिवसांत तयार होत असे. वाडिया पार्कसाठी मात्र आम्हाला 11 दिवस काम करावे लागले, असे त्यांनी सांगितले. ही स्पर्धा टर्फ विकेटवर खेळवण्याचे नियोजन होते. तथापि, नंतर ती मॅटवर खेळवण्याचा निर्णय झाला, असे ते म्हणाले.
उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. फुगे आकाशात सोडून, तसेच पाहुण्यांच्या हस्ते पहिला चेंडू टाकून स्पर्धेला सुरुवात होईल. त्याआधी खेळपट्टीची पूजा करण्यात येईल. उद्घाटन समारंभासाठी 4 ते 5 हजार व अंतिम सामन्यासाठी त्याहीपेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित राहतील, अशी संयोजकांची अपेक्षा आहे.
भास्कर गायकवाड यांच्याबरोबर शरद नरसाळे, सुभाष भागवत, मधू देशपांडे, दत्ताजी भोसले हे स्पर्धेची तयारी करीत आहेत. क्रॉम्प्टनचे एच. आर. मॅनेजर प्रेमराज जोसेफ, एन. एन. वैद्य यांच्यासह डी. एस. सोनवणे, अनंत कुलकर्णी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संजय बोरा, पंच शंतनु भावे यांनी सोमवारी वाडिया पार्कला भेट देऊन तयारीची पाहणी केली.