आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुगे सोडून क्रॉम्प्टन करंडक स्पर्धेचे थाटात उद्घाटन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - वाडिया पार्क मैदानावर मंगळवारी सुरू झालेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज करंडक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात ‘व्हीआरडीई’ संघाने ‘क्रॉम्प्टन कोल्टस्’ संघावर सात गडी राखून सहज विजय मिळवला.
‘व्हीआरडीई’ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ‘क्रॉम्प्टन कोल्टस्’ची सुरुवात चांगली झाली. मात्र, नंतरच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकल्याने या संघाला 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 123 धावांपर्यंत मजल मारता आली. ‘क्रॉम्प्टन’च्या संकेत धामणे याने 41, तर अतुल देठे याने 33 धावा केल्या. ‘व्हीआरडीई’च्या गजानन राडकर याने केवळ 8 धावा देऊन 3 फलंदाजांना तंबूत धाडले. बिनय याने 21 धावा देत चार बळी घेतले.
विजयासाठी 124 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ‘व्हीआरडीई’ने कोणतेही दडपण न घेता फलंदाजी सुरू केली. या संघाने 17.1 षटकांत केवळ 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. गजानन राडकर याने नाबाद 47, तर रोहिदास खरमाडे याने 24 धावा केल्या.
‘क्रॉम्प्टन’च्या क्षितीज देशपांडे, अनिल शितोळे, विपुल पारिक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अष्टपैलू कामगिरी करणा-या राडकर याला अनिल चितांबर व शैला चितांबर यांच्या हस्ते सामनावीर किताब देऊन गौरवण्यात आले. पंच म्हणून अमोल चितांबर आणि मिनीनाथ गाडिलकर यांनी काम पाहिले. नीलेश जरे यांनी धावलेखन केले.
त्याआधी फुगे आकाशात सोडून क्रॉम्प्टन करंडक क्रि केट स्पर्धेस मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. क्रिकेटप्रमाणेच इतर पारंपरिक खेळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन व्हीआरडीईचे संचालक डॉ. सी. पी. रामनारायणन यांनी या वेळी केले. क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप यांनी क्रिकेटबरोबरच इतर खेळांसाठीही वाडिया पार्क मैदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. महापौर शीला शिंदे व प्रा. माणिक विधाते यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक क्रॉम्प्टनचे जनरल मॅनेजर विजय लेले यांनी केले. सूत्रसंचालन अनंत कुलकर्णी यांनी केले. सूर्यकांत आघारकर यांनी आभार मानले. माजी महापौर संग्र्राम जगताप, संजय बोरा, एल. बी. म्हस्के, शंतनू भावे, वसीम हुंडेकरी, अरुण धामणे, अनंत देसाई आदी या वेळी उपस्थित होते.
बुधवारी हुंडेकरी अ‍ॅकॅडमी विरुद्ध पॅकर यांच्यात सकाळी 9 वाजता, तर झेडसीसी विरुद्ध देवगावकर अ‍ॅकॅडमी यांच्यात दुपारी 12 वाजता सामना होणार आहे.