आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांनी उडवला खरेदीचा बार, दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रकाशाचा सण असलेल्या दीपोत्सवाच्या सणाला वसू बारसेपासून अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. दीपोत्सवातील महत्वाचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा असतो, त्यामुळे लक्ष्मीपूजन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने नगरच्या बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. 

आकाश कंदील, रंगबिरंगी दिव्यांची तोरणे, फटाक्यांची दुकाने, दुकानांवर केलेली रोषणाई, कपड्यांपासून गृहपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी कुटुंबासह रस्त्यावर उतरलेले नगरकर आणि सर्वत्र झालेली वाहतूक कोंडी असे दृश्य मंगळवारी नगर शहरातील बाजारपेठेत होते. मंगळवारी धनत्रयोदशी होती. या दिवशी व्यापाऱ्यांनी हिशेबाच्या वह्यांचे पूजन केले. 
 
लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वह्या खरेदीसाठीही मोठी गर्दी होती. दीपोत्सवातील महत्त्वाचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा असतो. या दिवशी घरोघरी लक्ष्मीच्या मूर्तींचे पूजन केले जाते. शहरातील कापडबाजार, लक्ष्मीकारंजा, चौपाटी कारंजा, माळीवाडा, सर्जेपुरा, दिल्लीगेटसह विविध भागात ग्राहकांनी दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. बाजारात दिवाळीच्या सणाला खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी लोटली अाहे. 
 
मंगळवारी धन्वंतरी पूजनही करण्यात आले. जिल्हा रुग्णालय शासकीय रुग्णालयात धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते आयुष स्पेशालिटी ओपीडीचे उद््घाटन झाले. आरोग्य भारती' संघटनेचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुनील जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत प्रमुख नानासाहेब जाधव, जिल्हाधिकारी अभय महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रभाकर पवार, महाराष्ट्र कौन्सिल आॅफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, एमसीआयएम सदस्य डॉ. राजेंद्र ठाकूर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. रावसाहेब अनभुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग बुरुटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे आदी उपस्थित होते. 
 
खासदार गांधी म्हणाले, खासगी वैद्यकीय तज्ज्ञांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार देणे स्तुत्य आहे. आयुष मंत्रालयाच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असल्याने नगर येथे सामान्य जनतेसाठी आयुष मंत्रालयाच्या मोठ्या योजना आणू असे त्यांनी सांगितले. 

सोने खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी 
धनत्रयोदशीलासोने खरेदी केल्याने समृद्धीत वाढ होते, अशी परंपरा असल्याने मंगळवारी शहरातील सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी दिसून आली. अनेकजण या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करतात. सणासुदीच्या दिवसात सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात असल्याने सुवर्णकारही वैविध्यपूर्ण दागिन्यांसह सज्ज झाले होते. नेकलेस, अंगठी, तोडे, पाटल्या, बांगड्या, चपलाहार, कर्णफुले, मोहनमाळ, साखळी खरेदीसाठी महिलांची विशेष गर्दी सराफ दुकानांमध्ये होती. धनत्रयोदशीनिमित्त शहरातील सराफ व्यावसायिकांनीही विविध योजना जाहीर करून ग्राहकांना आकर्षित केले. 
 
बातम्या आणखी आहेत...