आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या लागल्या रांगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता पासची सुविधा राबवली जाते. महामंडळाला दिवसाकाठी सुमारे 1 लाख रुपयांचे उत्पन्न या योजनेतून मिळते. पण तारकपूर आगारात पास काढण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना महामंडळाने केलेल्या सोयी गोंधळाच्या ठरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासन्तास ताटकळण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज एस. टी. बसने बाहेरगावाहून नगरमध्ये येत असतात. बसचा विद्यार्थी पास त्यांना दरमहा नूतनीकरण करून घ्यावा लागतो. शिक्षणासाठी नगर शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांना नवीन पास काढण्यासाठी किंवा आधीच असलेल्या पासचे नूतनीकरण करण्यासाठी माळीवाडा व तारकपूर बसस्थानकावर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सोय व्हावी व प्रशासनावरील ताण कमी व्हावा, असा चांगला हेतू त्यामागे असला तरी या सुविधा विद्यार्थ्यांसाठी मात्र काही प्रमाणात अडचणीच्या ठरत आहेत.

तारकपूर बसस्थानकावर विद्यार्थ्यांना दर सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी नवीन पास दिला जातो, तसेच जुन्या पासचे नूतनीकरण करून दिले जाते. विद्यार्थिनींना दर मंगळवारी, गुरुवारी व शनिवारी नवीन पास देण्यात येतो आणि जुन्या पासचे नूतनीकरण करून दिले जाते. एकाच दिवशी विद्यार्थी-विद्यार्थिनी पास काढण्यासाठी आले, तर प्रचंड गोंधळ उडतो. मुलींना बाहेरच्या टारगट मुलांचा त्रास होतो. त्यामुळे आठवड्यातून तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी व तीन दिवस विद्यार्थिनींसाठी परिवहन महामंडळाकडून ठरवून देण्यात आले आहेत.

तारकपूर आगारात विद्यार्थी पासचे काम करण्यासाठी अवघा एकच कर्मचारी आहे. पास काढण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता हे मनुष्यबळ अत्यल्प आहे. शिवाय पासचे काम करणार्‍या कर्मचार्‍याला कार्यालयीन कामाच्या वेळेत दुपारी एक तासभर जेवणाची सुटी असते. सुटीची वेळ संपली, तरी पासची खिडकी लवकर उघडली जात नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांंवर ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय रांगेत उभे राहूनही अनेकदा विद्यार्थ्यांना पास मिळत नाही. त्यामुळे पुन्हा दोन दिवसांनी हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये महामंडळाच्या कारभाराबाबत संताप निर्माण होत आहे. काही पालकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.

जून महिन्यातील विद्यार्थी पासची संख्या
अहिल्याबाई होळकर विद्यार्थी पास - 37, प्राथमिक विद्यार्थी मोफत पास - 27, माध्यमिक विद्यार्थी पास - 199, उच्च् माध्यमिक विद्यार्थी पास - 344, महाविद्यालयीन पास - 1 हजार 499, व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थी पास - 416.