आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural News In Marathi, Marathi Day Celebration Ahemadnagar, Divya Marathi

पंचायती नांगरतो, सोसायट्या कोळपतो, लिकर आम्ही गाळतो..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘‘आम्ही आडनावाचे शेतकरी रे.. पंचायती नांगरतो, सोसायट्या कोळपतो, कारखाने काढुनी लिकर आम्ही गाळतो.. विर्शामगृहातून करू पेरणी, विमानातून करू खुरपणी, लाल दिव्यातून करू राखणी, प्रकल्पातून करू कापणी, सहकाराच्या गोफणीने पाखरं हाकू रे, आश्वासने पेरुनिया भूलथापांचा डोस देऊ, झेंडेगाडे फिरवून, बहुमताचे पीक घेऊ.. आम्ही आडनावाचे शेतकरी रे..’’
नारायण सुमंत यांच्या या उपहासिकेला रसिकांनी हशा आणि टाळ्यांनी भरभरून दाद दिली. प्रेमगीतं, विरहगीतं, गझल, मुक्तछंद, वातट्रिका अशा विविध प्रकारच्या काव्याचा आस्वाद घेण्यासाठी सभागृह अगदी गच्च भरले होते.
कविर्शेष्ठ कुसुमाग्रज दिन अर्थात ‘मराठी दिना’निमित्त आकाशवाणी नगर केंद्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित ‘आशयघन’ कविसंमेलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, महेश केळुस्कर, नारायण सुमंत, सुनील शिनखेडे, प्रा. दासू भगत व डॉ. संगीता बर्वे यांच्या कविता ऐकण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते. फ. मुं. शिंदे, यशवंत मनोहर, अरुणा ढेरे, अरुण म्हात्रे, इंद्रजित भालेराव हे कवी काही कारणांमुळे या बहारदार कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत.
मैफलीची सुरुवात झाली ती मूळचे मिरजगावचे असलेले प्रकाश घोडके यांच्या ग्रामीण ढंगाच्या विफल प्रेमाच्या कवितेने. ‘तुझ्या दारावरून जाताना एक सांगतो कानात, मुक्या मुक्यानेच सारा, खेळ खेळलो मनात..’ या त्यांच्या ओळी रसिकांना खूप काही सांगून गेल्या. ‘हिरव्या पदराखाली ऊन सावलीला आलं, तिचा थरारला ऊर, आत झाली घालमेल, तिच्या उरात गारवा, त्याचं जाळतं अंगं, त्याला इझुता इझुता, तिही पेटे जाळासंगं..’ ही त्यांची कविताही भाव खाऊन गेली.
रामदास फुटाणे यांनी मराठी भाषेच्या भवितव्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेवर नेमके भाष्य करणारी उपहासिका ऐकवली. ‘आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली, शेंबडी नातवंडे इंग्रजी वाचू लागली, रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली, परिणाम असा झाला..अजाणवृक्षाच्या मुळाखालील माती खचू लागली आणि इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली..’ फुटाणे यांनी त्यांची ‘चांगभलं’ ही गाजलेली कविताही ऐकवली.
सरकारचे शेतीविषयक धोरण आणि पाटबंधारे खात्यावर कोरडे ओढणारी सुमंत यांची कविता रसिकांना भावली. ‘धरण झाले बांधुनी अन् पावसाळा कोरडा, हरितक्रांती-धवलक्रांती गलबला खोटारडा, गिफ्ट देऊनी लिफ्ट बसवा, पाट घ्या रानात रे, ओलवा रे हात त्यांचा जो सदाचा कोरडा..’ ही कविता त्यांच्या टिपण्या व अभिनयाने चांगली दाद घेऊन गेली. ‘बापूजी आणि त्यांची बकरी’ या कवितेतही त्यांनी भ्रष्टाचारावर कोरडे ओढले.
मूळच्या नगर जिल्ह्यातील बेलापूरच्या आणि सध्या पुण्यात वास्तव्य असलेल्या डॉ. संगीता बर्वे यांनी रुग्णमित्राची मरण्याआधी अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त करणारी गंभीर कविता सादर केली. ‘मेल्यानंतर तरी हे भाग जिवंत राहतील माझ्यातले, शिवाय किती जणांत विभागला जाईन मी, कुणाकुणाच्या देहांत नांदत राहीन मी..’ या ओळी मनात घर करून बसल्या.
दासू वैद्य, सुनील शिनखेडे यांच्या कवितांनाही रसिकांनी दाद दिली. ‘कवीला हवा असतो रोज नव्या सूर्याचा नवा डंख’ ही शिनखेडे यांची कविता आणि नंतर त्यांनी सादर केलेली ‘मोहरलो मी हरताना डाव गुलाबी, सावरलो मी हरतानाही डाव गुलाबी’ ही गझल र्शोत्यांना वेगळ्या विश्वात घेऊन गेली.