आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला आणि संस्कृतीतून मिळते शहराला ओळख..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कोणत्याही शहराला ओळख मिळते ती कला आणि संस्कृतीमुळे. नगर शहराची ही ओळख निर्माण करण्याचे काम आयएमएस व्हिडिओकॉन अकॅडमी ऑफ फाइन अँड परफॉर्मिंग आर्ट्स करीत आहे, असे गौरवोद्गार रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी काढले.

आयएमएस व्हिडिओकॉनच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित दोन दिवसांच्या नृत्य महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झाले. गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करताना येलूलकर बोलत होते. डॉ. भा. पां. हिवाळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. एम. अँस्टन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, संचालक डॉ. एम. बी. मेहता, प्राचार्य माधवी सराफ-रावळ, अँड. शरद पल्लोड आदी उपस्थित होते.

येलूलकर व अँस्टन यांनी संस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले. व्यावसायिक अभ्यासक्रमांबरोबरच संस्थेने नृत्य, ज्वेलरी डिझाइन, परकीय भाषा शिक्षण, पर्यटन असे विविध अभ्यासक्रम सुरू करून युवा वर्गाला नवी दिशा दिली आहे, असे ते म्हणाले. एकूण व्याप पाहता संस्थेला नृत्यासाठी विशेष विभाग सुरू करावा लागेल, असे अँस्टन यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. कोलते यांनी आयएमएसच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार होण्याची गरज असून त्यासाठी परंपरा आणि संस्कृती जपणारे कलाशिक्षण उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. शास्त्रीय व आधुनिक नृत्याचा मिलाफ घडवण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे प्राचार्य सराफ म्हणाल्या.

अतिथींचा परिचय पूजा शेंडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा तांदूळवाडकर यांनी केले. डॉ. मेहता यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते.