आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपाट घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांना नोटिसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अंगणवाडी सेविकांनी खरेदी केलेल्या कपाट घोटाळाप्रकरणी अहवालात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक अंगणवाडीसेविकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविकांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच अधिकार कक्षेत नसलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांना पाठवला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी शनिवारी कपाट घोटाळ्यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला.

अध्यक्ष गुंड म्हणाल्या, कपाट घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी जी समिती नेमली होती, त्या समितीने अहवाल दिला आहे. हा अहवाल पुढील कारवाईसाठी आयुक्तांना पाठवला नाही. कारण कपाट खरेदीसाठी निधी आयुक्तस्तरावरून वितरित झाला होता.

बिनवडे म्हणाले, त्रिस्तरीय समितीने कपाट घोटाळ्यासंदर्भात चौकशी केली. त्यात एकही कपाट निकषानुसार खरेदी केलेले नाही. काही सेविकांनी दिलेल्या जबाबानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कपाट दिल्याचे सांगितले. आम्ही कोणताही पुरवठा आदेश यासंदर्भात दिला नाही. सेविकांनी हे कपाट खरेदी करायचे होते, त्यामुळे या प्रकारात सेविकाही जबाबदार आहेत. प्रकल्प अधिकारी राजूर, संगमनेर, घारगाव १, घारगाव २, राहाता, कोपरगाव, राहुरी, नगर १, नगर २, भिंगार, कर्जत, जामखेड येथील प्रकल्प अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला आहे. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे. महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कपाट खरेदीचा विषय समितीसमोर ठेवला नाही. त्यांच्यावरही विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. पुढे काय कारवाई करायची यासंदर्भात वकील मंडळाकडून सल्लाही मागितला आहे. त्यानंतर फौजदारी कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.

पावत्याही बोगस आढळल्या
अंगणवाड्यात निकृष्ट कपाटांचा पुरवठा करण्यात आल्यानंतर पुरवठादाराने बिलाच्या पावत्या दिल्या. पण त्या पावत्यांच्या नावे कोणतेही दुकानच अस्तित्वात नाही. पावत्याही बोगस निघाल्याने पोलिस चौकशी लावून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...