आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल खरेदीप्रकरणी दहा दिवसांत कारवाई, मुख्‍य कार्यकारी अधिका-यांचे अाश्‍वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - समाजकल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या सायकल खरेदीची बिले गुणवत्ता तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच अदा केल्याचा आरोप करून संबंधितांवर कारवाईची मागणी जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेत करण्यात आली होती. तक्रारीत तथ्य असल्याचे प्रशासनाने मान्य केले असून याप्रकरणी दहा दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या सोमवारी (१९ जानेवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील इतिवृत्त वाचून कायम करण्याच्या विषयाच्या वेळी सदस्य बाळासाहेब हराळ यांनी समाजकल्याणने खरेदी केलेल्या साहित्यप्रकरणी काय कारवाई केली, असा सवाल केला. सायकलींसह इतर साहित्याचा ठेकेदाराकडून पुरवठा झाल्यानंतर त्यांची तपासणी आयटीआयकडून होणे अपेक्षित आहे. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी सॅम्पल तपासणीचे निर्देश दिले होते. तथापि, अहवाल न येताच बिल अदा केल्याचे उघड झाल्यामुळे समाजकल्याण विभागाचे अधिकारी अडचणीत आले आहेत. सोमवारी झालेल्या सभेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप म्हणाले, तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. यासंदर्भात आलेला खुलासा आम्ही अमान्य केला असून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. यावर सदस्य सत्यजित तांबे यांनी केव्हा कारवाई करणार असा सवाल केला. त्यावर नवाल म्हणाले, अहवाल आला असून दहा दिवसांत कारवाई केली जाईल.