आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये रुजतोय सायकलचा ट्रेंड...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवावर्गात सायकलीची क्रेझ वाढत चालली आहे. - Divya Marathi
युवावर्गात सायकलीची क्रेझ वाढत चालली आहे.
नगर - विना प्रदूषण,आरोग्यदायी प्रवासासाठी अनेक वर्षांपासून सायकलचा वापर केला जातो. पण अलीकडच्या वीस वर्षांत मोटारसायकली, तसेच चारचाकी वाढल्याने रस्त्यावर एखादीच सायकल दिसते, परंतु आता आधुनिक सायकली उपलब्ध होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन युवकांमध्ये सायकलचा ट्रेंड पुन्हा एकदा रुजतो आहे. जास्तीत जास्त नगरकरांनी प्रतिष्ठेचा विचार करता शहरांतर्गत प्रवासासाठी सायकलीचा वापर करावा, असे आवाहन दैनिक दिव्य मराठीच्या वतीने करण्यात आले आहे.

अनेक वर्षांपासून दळणवळणाचे महत्त्वाचे साधन म्हणून सायकलीचा वापर केला जात आहे. पूर्वी साध्या ब्रेकची सायकल शासकीय नोकरदारापासून दूध घालणारा शेतकरीही वापरे. सायकलीचा नियमित वापर करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण दिवसेंदिवस विज्ञानात होत असलेली प्रगती वाढलेली क्रयशक्ती यामुळे सायकलीऐवजी मोटारसायकलीकडे सर्व स्तरातील नागरिकांचा कल वाढला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते ८० च्या दशकापर्यंत साध्या ब्रेकच्या सायकलींना मागणी होती. शहरासह ग्रामीण भागातही दूरवरचा प्रवासही सायकलीनेच केला जात असे. सायकल ही दळणवळणासाठी महत्त्वाची गरज बनल्याने ज्यांच्याकडे सायकल नाही, त्यांच्यासाठी भाडेतत्वावर सायकलीही उपलब्ध होत्या. नगर शहरात माळीवाडा, दालमंडई, आशा चौक आदी ठिकाणी सायकल भाड्याने दिल्या जात.

सायकल चालवणे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. या व्यायामामध्ये शरीराचा कमरेखालचा भाग पूर्णपणे सक्रिय राहतो. त्यामुळे शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यही टिकून राहते. सायकलिंगमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेला रक्तप्रवाह सुरळीत होतो. तज्ज्ञांच्या मते सायकलिंगमुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

नियमित सायकल चालवल्यास शरीराचे स्नायू बळकट होतात. विशेषत: कमरेखालच्या भागाचे म्हणजेच मांड्या आणि पोटऱ्यांचे स्नायू बळकट होतात. या व्यायामामुळे पाय आणि कमरेला इजा होत नाही, तसेच पायांची कार्यक्षमता प्रतिकारशक्ती वाढते. अशी बहुगणी सायकल काळाच्या ओघात मागे पडली. त्याची जागा मोटारसायकलींनी घेतली. उच्चभ्रू मध्यमवर्गीयांनी ऐपतीनुसार चारचाकी खरेदीकडे कल वाढवला. पण या आरामदायी जीवनशैलीच्या नादात प्रत्येकाने आपले आरोग्य गमावले. आता डॉक्टरांकडूनही व्यायामाचा सल्ला दिला जातो. पण धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे सायकल हा आरोग्यदायी पर्याय अनेकांकडून निवडला जात आहे.

सायकलविक्रेत्यांची संख्या कमी झाली असली, तरी आठ प्रमुख विक्रेत्यांचा व्यवसाय शालेय विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे तेजीत आहे. वर्षाकाठी एका दुकानात सरासरी दोन ते तीन हजार सायकलींची विक्री होते.

प्रदूषणमुक्तीसाठी सायकल वापरण्याचा सल्ला
वर्षभरातशहरात २४ हजारांहून अधिक सायकलींची विक्री होते. बदलत्या जीवनशैलीत आरोग्यदायी सदृढ जीवन प्रदूषणमुक्तीसाठी सायकलचा पर्याय निवडला जात असल्याचे पाहणीत आढळून आले. सायकल चालवून आरोग्य पर्यावरण दोन्ही वाचवावेत, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

सायकलीचे फायदे
>मानसिक ताण कमी होतो
>हृदयाची क्षमता वाढते
>रक्ताभिसरण चांगले होते.
>फुप्फुसांची क्षमता वाढते.
>भूक वाढते.
>स्नायू बळकट होतात.

आठवड्यात एकदा ‘सायकल डे’
सायकलीच्या नियमित वापरामुळे आपले आरोग्य सदृढ राहते, पैशांची बचत होते, पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही. त्यामुळे नगरकरांनी आठवड्यातील एक दिवस सायकल डे म्हणून पाळायला हवा. जवळच्या प्रवासासाठी प्रत्येकाने सायकलच वापरायला हवी.'' विष्णू ढवळे, सामाजिक कार्यकर्ता.