आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षता समितीच्या सभेत अधिकारी धारेवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा परिषदेसह अनेक विभागांनी जुनेच अहवाल सादर केल्याने जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत नाराजी व्यक्त केली. दोन्ही खासदारांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात दक्षता व सनियंत्रण समितीची सभा शुक्रवारी झाली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे व दिलीप गांधी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वसंत गारुडकर आदी यावेळी उपस्थित होते.

इंदिरा आवास योजनेसाठी निधी कमी मिळाल्याने अनेक घरांची कामे मंजूर असूनही सुरू करता आली नाहीत, असे अग्रवाल यांनी सांगितले. ई-संग्राम किंवा ई-पंचायत योजनेंतर्गत अनेक गावांतील दैनंदिन कामकाज संगणकीकृत झाले नसल्याची कबुली त्यांनी दिली.

मागील सभेत गैरहजर राहिलेल्या अधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी नोटिसा बजावल्या असताना या सभेसही गटविकास अधिकारी गैरहजर असल्याबद्दल वाकचौरे यांनी नाराजी व्यक्त केली. संगमनेर येथील गटविकास अधिकारी नागरिकांना अपशब्द वापरत असल्याकडे लक्ष वेधून त्यांच्यावर कारवाईचा ठराव वाकचौरे यांनी मांडला.

नव्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर रुजू झालेल्या अंकुश माने यांना वाकचौरे यांनी फळबाग अनुदानाची माहिती विचारली. त्यावर माने यांनी आतापर्यंत 80 हजार शेतकर्‍यांना 95 कोटी रुपयांचे अनुदान वाटण्यात आल्याचे सांगितले. फळबागांचे अनुदान वाटताना राजकारण करण्यात कृषी अधिकारी आघाडीवर आहेत. खोटे बोलून वेळ मारून नेण्यापेक्षा मेळाव्यांचे राजकारण थांबवा, अशा कडक शब्दांत वाकचौरे यांनी कृषी अधिकार्‍यांची कानउघाडणी केली.