आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित संघटनांचा प्रतिमोर्चा रद्द, मराठा समाजाला न्याय देण्यात त्यांचेच नेते अपयशी : अशोक गायकवाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर लोकशाही मार्गाने मराठा समाजाचे मूकमोर्चे निघत आहेत. मराठा समाजाने संघटित होणे ही चांगलीच बाब आहे. मात्र, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे हा दलित समाजावर अन्याय केल्यासारखे होईल. मुळात मराठा समाजाचे आरक्षणासह इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राज्याचे मुख्यमंत्रिपद आजवर बहुतांश वेळा मराठा समाजाकडेच होते. मात्र, ते या समाजाला न्याय देण्यास अपयशी ठरले, अशी टीका रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी केली. पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे दलित संघटनांचा मोर्चा निघणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्तीची मागणी मराठा समाजाच्या मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजय साळवे उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, देशात पंचवीस टक्के असलेल्या दलितांना या कायद्यामुळे संरक्षण मिळाले आहे. हा कायदा रद्द केला, तर त्यांच्यावर अन्याय होईल.

मोर्चात शाळकरी मुलांना सहभागी करुन घेतले जात आहे. या वयात मुलांवर देशप्रेम, बंधुभावाची शिकवण व्हायला हवी. मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्यावर जातीपातीचा पगडा बिंबवला जात असून ही चिंतेची बाब आहे. काँग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष आजवर निधर्मी असल्याचे सांगत आले. आता मात्र याच पक्षाचे नेते जातींच्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. हे भयावह चित्र आहे. हे पक्ष आपली मार्गदर्शक मूल्ये विसरुन जातीयवादी झाल्यामुळे देशातील वातावरण दूषित झाल्याची टीकाही त्यांनी केली.

सोशल मीडियावर सध्या जातीयवाद पसरवला जात असून विखारी स्वरुपाचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. पोलिसही अशा स्वरुपाच्या पोस्टवर कडक नजर ठेवून आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

मराठा दलित समाज या एकाच नाण्याच्या बाजू
मराठा दलित समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन समाजात जर संघर्ष होणार असेल, तर तो कोणालाच परवडणारा नाही. सोशल मीडियातून या दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडले आहे. अशाने देशाला जातीयवादाच्या खाईत लोटले जाईल. त्यामुळे या दोन समाजांनी एकोपा राखणे ही काळाची गरज आहे, असे गायकवाड पत्रकार परिषदेत म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...