आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalit Organizations Of The Movement For Sonai Murder Case

सोनई हत्याकांड खटला जलदगती न्यायालयात चालवावा या मागणीसाठी दलित संघटनांची निदर्शने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सोनई (ता. नेवासे) येथील दलित समाजातील तीनजणांच्या हत्याकांडाचा खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवा, या मागणीसाठी दलित समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
सोनई हत्याकांडाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाल्याने दलित संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जाधव यांची भेट घेऊन हत्याकांड प्रकरणाच्या तपासाबाबत चर्चा केली. लोक अधिकार आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अँड. अरुण जाधव, कामगार नेते अनंत लोखंडे, मानव मुक्ती संग्रामचे पदाधिकारी सुनील चव्हाण, दलित आदिवासी अधिकार आंदोलनाचे पदाधिकारी प्रियदर्शी तेलंग, रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, स्वच्छताकार एकता मंचचे महासचिव धनराज चावरिया, अनिल तेजी, कन्हैया गिलशेर, सुभाष वैराळ, मुकुंद गिलशेर, सुदर्शन गोयर, प्रवीण घावरी, विजय काळे, वीरसिंग करोसिया, सुनील साळवे आदी यावेळी उपस्थित होते.
सोनई हत्याकांडातील साक्षीदारांवर दबाव आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे साक्षीदारांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी अरुण जाधव यांनी केली. त्यानंतर पदाधिकार्‍यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकार्‍यांनी आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. राज्य सरकारचा धिक्कार असो, अशा सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. चर्चेनंतर वाडेकर यांनी जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनई हत्याकांड प्रकरणामुळे महाराष्ट्राची जगात नाचक्की झाली आहे. महाराष्ट्र सरकार दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी कुठलेही पावले उचलीत नाही. राज्यात स्वतंत्र न्यायालये व स्वतंत्र पोलिस ठाणे अजूनपर्यंत स्थापन झालेले नाही. सोनई हत्याकांड प्रकरणाचा खटला खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अजूनही तसे झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.