आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपुरात दलित तरुणाचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - किरकोळ भांडणाचा राग मनात धरून दलित तरुणाची धारधार शस्त्राने पोटात व छातीवर वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (25 जुलै) रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहरातील संजयनगर भागात घडली. याप्रकरणी तीन आरोपींवर खुनाचा व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी मृताच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको केला. पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या विनंतीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेता पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले.

बाळासाहेब राजेंद्र लोंढे (25, संजयनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत बाळासाहेबची मावशी वत्सला विनायक खुडे (50, रा. संजयनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास बहिणीचा मुलगा मृत बाळासाहेब याचे आरोपी दस्तगीर गफूर शहा याच्याशी भांडण झाले होते. यावेळी बाळासाहेब याने दस्तगीरच्या कानशिलात लगावल्याचा राग मनात धरून संजयनगर येथेच राहणारे आरोपी दस्तगीर, जावेद गफूर शहा, अरबाज (पूर्ण नाव माहिती नाही) या तिघांनी बाळासाहेब याची धारधार शस्त्राने पोटात व छातीवर वार करून हत्या केली. या घटनेनंतर शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी शहर पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको केला. पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी केलेल्या विनंतीवरून आंदोलन मागे घेत चर्चेसाठी जमाव पोलिस ठाण्यात आला. तेथे मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, या भूमिकेवर ठाम राहात पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, सुभाष त्रिभूवन, संदीप मगर, अशोक बागूल, सुनील मगर, फिरोज पठाण आदी उपस्थित होते. याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुपारी पुन्हा आंदोलन
दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास मृताच्या नातेवाईकांनी पुन्हा शहर पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले. काहींनी बळजबरीने दुकाने बंद करायला लावले. त्यामुळे बरीच दुकाने बंद झाली. आठ दिवसांत आरोपींना अटक करू, या पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.