आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित युवकाची हत्या; स्थायी सभापती अाराेपी, घाटात सापडला मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -महिनाभरापूर्वी बालसुधारगृहातून पळून गेलेल्या दलित युवकाच्या खूनप्रकरणी बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलिस ठाण्यात नगर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सनी शरद शिंदे (१७, भाेसले आखाडा, बुरुडगाव रस्ता, नगर) असे त्या युवकाचे नाव असून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल होता. या प्रकरणातूनच त्याचा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून चार जणांना पाटोदा पोलिसांनी ताब्यात घेतले.

नगर जिल्ह्यात दलितांवरील अत्याचाराचे सत्र थांबायला तयार नाही. नितीन साठे या दलित युवकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच प्रेमप्रकरणातून आणखी एका दलित युवकाचा बळी गेला. जामखेड-बीड रस्त्यावरील सौताडा घाट परिसरात १ जुलै रोजी सनीचा मृतदेह आढळला होता. पाटोदा पोलिसांनी मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. २ जुलैला मृतदेह सनीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या हाता-पायांवर दोराने बांधल्याच्या खुणा व चार ते पाच दिवसांपूर्वी मारहाण केल्याच्या जखमा आढळल्या.

सनीची आत्या नंदा अरुण घोडके यांनी २ जुलैला दिलेल्या फिर्यादीवरून ११ जणांविरूद्ध खून व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये स्थायी समितीचे सभापती भोसले यांचे नाव आल्याने शहरात खळबळ उडाली असून पाटोदा पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. पोलिसांनी चार जणांनाताब्यात घेतले अाहे.त्यांची चौकशी सुरू आहे.

अन्य आरोपींमध्ये निशान रईस शेख, अस्लम शेख, अजहर शेख, अफजल शेख, इब्राहिम शेख, मन्नान शेख, मोहंमद अली शेख, अलताफ शेख, दिलावर सय्यद, मज्जू शेख व गणेश कुंडलिक भोसले यांचा समावेश आहे.

शहरातील एका अल्पवयीन मुलीचे २२ मे रोजी अपहरण केल्याचा गुन्हा सनी, त्याचे वडील शरद व भाऊ संदीप शिंदे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यात नंतर लैंगिक अत्याचाराचे कलम लावण्यात आले. कोतवाली पोलिसांनी सनीला २६ मे रोजी ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशाने त्याची रवानगी बालसुधारगृहात झाली. त्याचे वडील व भाऊ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सुरक्षारक्षकाला मारहाण करून सनीसह सहा विधिसंघर्षग्रस्त मुलांनी ३० मे रोजी बालसुधारगृहातून पलायन केले. यासंदर्भातही कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून सनीचा शोध सुरू होता. मात्र, शेवटी त्याचा मृतदेहच सापडला.

प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय
बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून तसेच सनी हा अनुसूचित जातीचा आहे, हे माहीत असतानाही आरोपींनी संगनमत करून सनीचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सनीच्या खुनामागे प्रेमप्रकरणच असल्याचा दावा फिर्यादीतून पुढे आला. पोलिसांनीही त्यादृष्टीने तातडीने हालचाली करून चौघांना ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.