आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दळवी खूनप्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शीलाविहार परिसरात झालेल्या ताराचंद दळवी खूनप्रकरणात न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेप, तर एका महिलेला तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सागर विजय काळे (20 वर्षे), विशाल अशोक काळे (24 वर्षे) व सिमरन बशीर शेख (23 वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत.

6 मे 2011 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ताराचंद दळवी हे शीलाविहार परिसरातील केकडे हॉस्पिटलसमोरुन जात होते. त्यावेळी आरोपींची आपसांत भांडणे सुरु होती. दळवी यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी त्यांनाच शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे दळवी तेथून जवळच असलेल्या कुटुंबीयांकडे मदतीसाठी धावले. आरोपींनी ताराचंद दळवी, पोपटराव दळवी यांना जबर मारहाण केली. ताराचंद यांना जबर मार लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांचे निधन झाले.
याप्रकरणी ताराचंद यांचा पुतण्या अभिजित पोपटराव दळवी याने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एन. चौरे यांच्यासमोर चालली. सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची व वैद्यकीय अधिका-यांची साक्ष महत्त्वाची ठरली. ताराचंद दळवी यांना जीवे मारण्याचा हेतू नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला, पण सरकार पक्षातर्फे तो खोडून काढण्यात आला.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. रमेश जगताप यांनी काम पाहिले. त्यांनी हा गंभीर गुन्हा असल्याचा युक्तिवाद करुन आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य करत सागर काळे व विजय काळे यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सिमरन शेख हिला मारहाण केल्याबद्दल दोषी धरुन तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.