आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित : पिचड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असून, पाणी सोडण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री मधुकर पिचड यांनी मंगळवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पिचड बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, खासदार दिलीप गांधी, आमदार चंद्रशेखर घुले, महापौर संग्राम जगताप, पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, जि. प. अध्यक्ष विठ्ठल लंघे, सीईओ शैलेश नवाल आदी यावेळी उपस्थित होते.
पिचड म्हणाले, टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. जनावरांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी टँकरच्या खेपा वाढवण्यात आल्या आहेत. भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्याबाहेर चारा नेण्यास बंदी घालण्यात येणार आहे. पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी केंद्राच्या योजनेतून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून चारा उपलब्ध होऊ शकतो, असे ते म्हणाले.

पिचड पुढे म्हणाले, दानशूर व्यक्ती, सहकारी संस्था, बँका, खासगी उद्योग यांनी पुढे येऊन पाणी साठवण्यासाठी टाक्या उपलब्ध करून द्याव्यात. अभियंता डी. ए. कोळी, पशुसंवर्धनचे उपायुक्त एस. व्ही. पाठक, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. एस. गोसावी, कार्यकारी अभियंता ए. एस. वडार यावेळी उपस्थित होते.

शहराबाबत चर्चा नाही
बैठकीत नगर शहराच्या पाण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. महिनाभर पाऊस लांबल्यास शहरात पाणीकपात करावी लागेल, असे महापौर संग्राम जगताप नंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

टँकरची संख्या 304
जिल्ह्यात सध्या 304 टँकरने 242 गावे व 1100 वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. भंडारदरा धरणात सध्या 853 दशलक्ष घनफूट, मुळा धरणात 5 हजार 76 दशलक्ष घनफूट व निळवंडे धरणात 321 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.
फोटो - डमी पिक