आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माणिक चौक ते कापडबाजार रस्त्यावरील धोकादायक झालेली इमारत रविवारी दुपारी च्या सुमारास कोसळली. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर शहरातील सर्व धोकादायक इमारती तातडीने उतरवून घ्या, अशी सूचना आमदार संग्राम जगताप यांनी मनपा अधिकाऱ्यांना केली.
दोन वर्षांपूर्वी नेहरू मार्केटजवळील जुनी इमारत कोसळून वृध्दाचा जीव गेला होता. त्या घटनेनंतरही मनपा प्रशासनाला जाग आली नाही. पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यापलीकडे प्रशासन कोणतीच कार्यवाही करत नाही. मनपातील नोंदीनुसार शहरात ७४ धोकादायक इमारती आहेत. प्रत्यक्षात मात्र हा आकडा सव्वाशेपेक्षा अधिक आहे. इमारत मालक भाडेकरू वादामुळे या इमारती ‘जैसे थे’ आहेत. प्रत्येक पावसाळ्यात एक-दोन इमारती कोसळतात.

रविवारी माणिक चौक ते कापड बाजार या मुख्य रस्त्यावर असलेली इमारत कोसळली. हा परिसर वर्दळीचा आहे. इमारत कोसळली तेव्हा सुदैवाने रस्ता रिकामा होता. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले. आमदार जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी उर्वरित इमारत उतरवून घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले. शहराच्या विविध भागात असलेल्या धोकादायक इमारती तातडीने उतरवून घ्या, इमारत कोसळून एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्यास महापालिका जबाबदार असेल, असा इशारा जगताप यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिला.
बातम्या आणखी आहेत...