आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या चाळीस टाक्या केव्हाही कोसळतील, ग्रामपंचायत आणि झेडपीत समन्वयाचा अभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र, तसेच विविध योजनांतर्गत टाक्या उभारण्यात आल्या. यातील ४० टाक्यांची आर्युमर्यादा एक वर्षापूर्वीच संपली, तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने वर्षापूर्वी या विषयाकडे लक्ष वेधले होते. परंतु ढिम्म प्रशासनाने या टाक्या पाडण्याकडे दुर्लक्ष केले. जर टाक्या कोसळून जीवितहानी झाल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढतील. 
 
स्वतंत्र, तसेच प्रादेशिक पाणी योजनांच्या या टाक्या आहेत. त्यातील जुनाट, मोडकळीस आलेल्या टाक्या ७० ते ८० च्या दशकांतील आहेत. या टाक्या तत्कालीन लोकसंख्या विचारात घेऊन बांधण्यात आल्या होत्या. नंतर लोकसंख्येत झपाट्याने वाढ होऊन नवीन योजनेतून नवीन टाक्या उभारण्यात आल्या. परंतु अजूनही अनेक ठिकाणी जुन्या टाक्यांचा पाणी साठवून वितरणासाठी वापर केला जात आहे. 
 
चार दिवसांपूर्वी निंबोडी येथील निकृष्ट बांधकाम असलेली शाळा कोसळून तीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वच धोकादायक शाळा इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना बसवू देऊ नये, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने काढले. 

स्थानिक पातळीवर नळ पाणी पुरवठा योजनांच्या जीर्ण धोकादायक उंच टाक्यांचे सर्वेक्षण दीड वर्षापूर्वी करण्यात आले होते. त्यात जिल्ह्यातील ४९ पाण्याच्या टाक्या धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत कर्जत, राशीन, नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील, विळद, पारनेर तालुक्यात भाळवणी, पाथर्डी येथील भालगाव, श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा, घोगरगाव यासह नऊ ठिकाणच्या टाक्या पाडण्यात आल्या. अजूनही ४० धोकादायक टाक्या उभ्या आहेत. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी याबाबत उदासीन आहेत. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून टाक्या पाडण्याचे आदेश यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. 
 
धोकादायक पाण्याच्या टाक्या 
गणोरे,पिंपरकणे (अकोले), तेलंगशी, जवळा (जामखेड), वारी, भोजडे, काकडी जीएसआर, कोळगाव थडी, मंजूर, करंजी (कोपरगाव), नेप्ती, भोरवाडी, खडकी (नगर), प्रवरासंगम, वरखेड (नेवासे), ढवळपुरी, पोखरी (पारनेर), माणिकदौंडी, रुपलाचा तांडा, जांभळी, मुंगुसवाडे, एकनाथवाडी (पाथर्डी), लोणी खुर्द, हनुमंतगाव, कोल्हार बुद्रूक, शिंगवे (राहाता), उंबरे, वांबोरी (राहुरी), धांदरफळ (संगमनेर), एरंडगाव, शेवगाव, बालम टाकळी, कांबी, बोधेगाव (शेवगाव), बेलवंडी बुद्रूक, लिंपणगाव, मुंढेकरवाडी, तांदळी दुमाला, आढळगाव, पेडगाव (श्रीगोंदे), बेलापूर बुद्रूक. 

१२० टाक्या मोडकळीस 
जिल्ह्यातील १२० पाण्याच्या टाक्यांना बळकटीकरणाची गरज आहे, पण बळकटीकरण करता या टाक्यांचा वापर करण्यात आला किंवा तात्पुरती जुजबी उपाययोजना केली, तर या टाक्याही कोसळण्याची भिती आहे. जिल्हा परिषदेकडून या टाक्या पाडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...