आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दराडे यांचे आरोप चुकीचे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शिक्षण विभागातील कर्मचारी शशिकांत रासकर यांनी सीईटीधारकांना नियुक्ती देताना पैसे मागितल्याचा आरोप सदस्य बाजीराव दराडे यांनी केला. या आरोपाचे खंडन उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी करून दराडेंना कुणाच्या तरी सांगण्यावरून चुकीचे आरोप करणे शोभत नाही, ज्यांना स्वत: बोलता आले नाही, त्यांनी दराडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप केले, असा टोलाही शेलार यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य बाजीराव दराडे यांनी शिक्षण विभागातील कर्मचारी रासकर यांचे थेट नाव घेऊन शिक्षक नियुक्तीत पैसे घेतल्याचा आरोप केला. संबंधित कर्मचाऱ्याने शिक्षकांना बोलावूनही घेतले होते. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी गांभीर्याने घेऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शिक्षण विभागाने दराडे यांच्या आरोपांना थेट आव्हान देऊन आम्ही चौकशीसाठी तयार आहोत, असे स्पष्ट केले. त्यामुळे दराडे यांच्या आरोपात किती तथ्य आहे, हे चौकशीतच समोर येईल. रासकर यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप असतानाही आता उपाध्यक्ष शेलार त्यांचे पाठीराखे म्हणून रिंगणात उतरले आहेत.
शेलार म्हणाले, दराडे यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून शिक्षण विभागावर चुकीचे आरोप केले आहेत. असे, आरोप करणे दराडे यांना शोभत नाही. आम्ही कागदपत्रांची पडताळणी करून पारदर्शी पद्धतीने शिक्षकांना नियुुक्त्या दिल्या. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी धोरण ठरवून सीईटीधारकांना सोयीच्या ठिकाणी नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. पारनेर नगर तालुका वगळून या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
रासकर सारख्या कर्मचाऱ्यावर त्यांनी आरोप करणे चुकीचे आहे. चुकीच्या बातम्या देऊन शिक्षण विभागाला बदनाम करू नये. एखाद्याची गैरसोय झाली असेल, तर आम्ही त्यात दुरुस्ती सुचवली आहे.
कोणतीही माहिती घेता कोणीतरी खांद्यावर बंदूक ठेवल्यानंतरच दराडेंनी आरोप केले, असे असल्याचे शेलार यांनी सांगितले. दरम्यान, यानिमित्त जिल्हा परिषदेचे वातावरण राजकीयदृष्ट्या गढूळ झाल्याचे चित्र आहे.
सरपंच ग्रामसेवकांवर कारवाई
सभेतवैजयंती धनवडे यांनी दूषित पाण्याची बाटली समोर ठेवून आरोग्य विभागावर ताशेरे ओढले. यासंदर्भात बोलताना शेलार म्हणाले, दूषित पाण्याची जबाबदारी एकट्या आरोग्य विभागाची नाही. त्याला ग्रामपंचायतीच जबाबदार आहेत. सरपंच ग्रामसेवकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे; अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल.
दराडेंच्या खांद्यावर कुणाची बंदूक
उपाध्यक्षशेलार यांनी सदस्य दराडेंच्या खांद्यावर दुसऱ्याच कोणीतरी बंदूक ठेवून आरोप केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता दराडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारा पदाधिकारी आहे, की एखादा सदस्य याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. दराडे या प्रकरणात शेवटपर्यंत लढणार की, गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...