आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्गादायरा गोळीबार; परस्परविरोधी गुन्हे, आरोपींमध्ये नगरसेवक समद खान यांचाही समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मुकुंद नगरमधील दर्गादायरा परिसरात रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात एक युवक जखमी झाला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
एका गटाविरुद्ध दरोडा आर्म अॅक्ट, तर दुसऱ्या गटाविरुद्ध आर्म अॅक्टसह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच धरपकड केल्यामुळे काही आरोपी गजाआड करण्यात यश आले. आरोपींमध्ये महापालिकेतील राष्ट्रवादीचा गटनेता तथा नगरसेवक समद खान यांचाही समावेश आहे.

मागील वादाच्या कारणातून दोन गटांत धुमश्चक्री झाली. एका युवकावर गोळीबार करण्यात आला. शरीफ शेख नौशाद (२३) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक समद खानसह टयप्या, भुऱ्या, सॅम ऊर्फ समीर (पूर्ण नावे माहीत नाहीत) इतर जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगा करणे आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी हातात बंदूक, तलवार, गज, चॉपरने मारहाण केली. शरीफच्या दिशेने चार राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी शरीफच्या दंडात घुसली. याप्रकरणी मुजीब अजिद खान जैयद सय्यद रशीद यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दुसरी फिर्याद मुजीब अजिद खान याने दिली आहे. सादिक पोटली, मज्जू, भय्या नसिमचा भाऊ, रहिम, दिलावर (पूर्ण नावे माहीत नाहीत) इतर २० ते ३० जण हातात बंदूक घेऊन घरात घुसले. दाराचे, कपाटाचे, शोकेसचे नुकसान करुन दीड लाखाची रोकड दागिने त्यांनी चोरले. घराबाहेरच्या सुझुकी अॅक्सेसचे नुकसान केले, असे या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दरोडा, दंगा, अनाधिकाराने घरात प्रवेश करणे आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदवला असून सादिक नवाब शेख याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे, गुन्हे शाखेचे निरीक्षक शशिराज पाटोळे भिंगारचे सहायक निरीक्षक एम. डी. अहिरे तातडीने घटनास्थळी गेल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली. पोलिस उपनिरीक्षक जावळे तपास करत आहेत.