आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव घसरलेले असतानाही सोने खरेदीकडे पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- खरेदीसाठी पवित्र समजल्या जाणा-या साडेतीन मुहूर्तांपैकी दस-यांच्या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व व परंपरा आहे. मात्र सोन्याचे दर घसरल्याने दस-याला सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सराफा बाजारात दस-याच्या दिवशीही तुरळकच ग्राहक दिसून आले. आणखी भाव कमी होतील या आशेने ग्राहकांनी 'थांबा आणि पाहा' अशी नीती अवलंबली असल्याने ज्यांना सोने खरेदी करणे आवश्यक आहे तेच ग्राहक सोने खरेदी करताना दिसून आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपयाला मिळणारी बळकटी अथवा घसरण यामुळे सोन्याचे दर अस्थिर आहेत. गेल्या काही महिन्यात अपवाद वगळता सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याचे दर आणखी कमी होतील, या आशेपोटी सोने खरेदीसाठी नागरिकांनी प्रतीक्षा करणे पसंत केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरातील सुमारे अडीचशे सराफांच्या दुकानातून दहा कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होते. यावर्षी दसरा असूनही कमी प्रतिसाद मिळाल्याने अवघी एक ते दीड कोटींची उलाढाल होऊ शकली, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
शुक्रवारी 24 कॅरेट सोने 27 हजार 200 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 26 हजार 200 होता. दर स्थिर नसल्याने शुक्रवारी दसरा असतानाही सोने खरेदीसाठी अपेक्षित झुंबड उडाली नाही. कमी प्रतिसाद मिळाल्याने सराफा बाजारात निराशेचे वातावरण होते. दरासंदर्भात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही व्यापा-यांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये प्रत्यक्ष सोने खरेदी न करता त्याची बुकिंग केली जाते. त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. कमोडिटी मार्केट बंद करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, आशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

दिवाळीला प्रतिसाद मिळेल
सोन्याचे भाव आणखी कमी होतील, अशी ग्राहकांची अपेक्षा असल्याने सोने खरेदीबाबत संभ्रम वाढला. अपेक्षेपेक्षा अवघी दहा टक्केच उलाढाल सोने व्यवसायातून झाली आहे. दिवाळीला सोने खरेदीला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. कमोडिटी एक्स्चेंज मार्केटवर निर्बंध आणल्यास सोन्याचे भाव 20 ते 22 हजारांवर स्थिर होतील. रुपया अधिक बळकट होऊन डॉलरच्या तुलनेत ५० रुपयांपर्यंत पोहोचला तर आयात शुल्क कमी होऊन व्यापाऱ्यांना फायदाच होईल.'' तोष वर्मा, जिल्हाध्यक्ष, सराफ सुवर्णकार संघटना