पारनेर - लोकसभा निवडणुकीत ज्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्घ काम केले, त्यांनीच माझ्याविषयी गैरसमज करून देऊन जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय बदलण्यास भाग पाडले, अशी तक्रार बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्यावरून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी दाते यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले होते़ हा निर्णय न रुचल्याने दाते यांचे विरोधक झावरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन दातेंच्या निवडीस आक्षेप घेतला़. त्यानंतर दाते यांच्याऐवजी पांडुरंग आभंग यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले़ दाते यांची रद्द झालेली निवड, तसेच सोमवारच्या बैठकीत झालेल्या कलगीतुर्याच्या पार्श्वभूमीवर दाते यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवले आहे़
सुजित झावरे यांच्या समर्थकांनी हेटाळणी केल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणबाजी केली़ त्यानंतर झावरे यांनी दमबाजी करत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे दाते यांनी पत्रात नमूद केले आहे. वस्तुस्थिती सांगण्यासाठी पवार यांची भेटही त्यांनी मागितली आहे़
निवेदनात दाते म्हणतात, जिल्हाध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी रविवारी जाहीर केला़ माझ्या निवडीचे जिल्ह्यातून उत्स्फूर्त स्वागत झाले़ सोमवारच्या मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्याचे जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यातून हजारो पक्षसमर्थक राष्ट्रवादी भवनात जमा झाले होते़ ऐनवेळी निर्णय बदलण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज झाले.
मी सामान्य कार्यकर्ता आहे़ पक्षाशी प्रामाणिक आहे़ पक्षात राहून कधीही विरोधी भूमिका घेण्याचा माझा स्वभाव नाही़ कार्यकर्त्यांकडून कुठलाही पक्षविरोधी किंवा अनुचित प्रकार घडलेला नाही़, असे दातेंनी पत्रात म्हटले आहे.
(छायाचित्र - अशोक दाते यांचे छायाचित्र)