आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daya Pawar Award Precious For Me Actress Madhu Kambikar

दया पवारांच्या नावाचा पुरस्कार हा माहेरचा सन्मान- अभिनेत्री मधू कांबीकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दया पवार यांनी आपल्या साहित्यात दुर्लक्षित व उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा फोडली. ज्या समाजव्यवस्थेतून मी पुढे आले त्या परिस्थितीचे चित्रण त्यांनी केले. हा पुरस्कार म्हणजे माझ्या माहेरचा सन्मान आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांनी शुक्रवारी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचे पुरस्कार मधू कांबीकर, प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे व पत्रकार संतोष खेडलेकर यांना दादासाहेब रूपवते फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. प्रेमानंद रूपवते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना कांबीकर म्हणाल्या, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते मला गौरवण्यात आले तेव्हा मला रात्रभर झोप लागली नव्हती. पद्मश्री दया पवार यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माझी अवस्था तशीच झाली होती. ज्या समाजव्यवस्थेतून मी पुढे आले त्या परिस्थितीचे चित्रण दया पवार यांनी केले. ‘बलुतं’ म्हणजे तुमचं-आमचं साहित्य आहे. दया पवार यांच्या नावाचा पुरस्कार मला माझ्या माहेरचा सन्मान वाटतो , असेही कांबीकर म्हणाल्या. प्रास्ताविक दया पवार यांची कन्या कवयित्री प्रज्ञा पवार यांनी केले. कार्यक्रमास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हिराबाई पवार, प्रशांत पवार, प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, प्रा. स्नेहल रूपवते, रघुवीर खेडकर, वैशाली लोखंडे आदी उपस्थित होते.


दया पवार यांचे स्मारक व्हावे..
अकोलेच्या मातीत ज्यांनी स्वत:चे जीवन घडवले आणि ‘बलुतं’च्या माध्यमातून अकोले व धामणगाव आवारी या जन्मभूमीचे नाव सातासमुद्रापलीकडे नेले त्या दया पवार यांचे स्मारक अकोलेत व्हावे, अशी आम्हा कुटुंबीयांची इच्छा आहे, असे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हिराबाई पवार यांनी सांगितले.


तीच माणसं यशस्वी..
मराठी साहित्य समृद्ध करण्याचे काम दलित साहित्याने केले. व्यवस्थेला तडा देण्याचे काम जी माणसं करतात तीच आयुष्यात यशस्वी होतात व भरीव काहीतरी करू शकतात.’’ श्रीधर अंभोरे, ज्येष्ठ चित्रकार