आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दया पवारांच्या नावाचा पुरस्कार हा माझ्या माहेरचा सन्मान..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दया पवार यांनी आपल्या साहित्यात दुर्लक्षित व उपेक्षितांच्या प्रo्नांना वाचा फोडली. ज्या समाजव्यवस्थेतून मी पुढे आले, त्या परिस्थितीचे चित्रण त्यांनी केले. हा पुरस्कार म्हणजे माझ्या माहेरचा सन्मान आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांनी शुक्रवारी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचे पुरस्कार मधू कांबीकर, प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे व पत्रकार संतोष खेडलेकर यांना दादासाहेब रूपवते फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. प्रेमानंद रूपवते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अकोले येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते महाविद्यालयाच्या के. बी. दादा नवले सभागृहात हा कार्यक्रम झाला.

सत्काराला उत्तर देताना कांबीकर म्हणाल्या, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते मला गौरवण्यात आले, तेव्हा मला रात्रभर झोप लागली नव्हती. पद्मश्री दया पवार यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माझी अवस्था तशीच झाली होती. ज्या समाजव्यवस्थेतून मी पुढे आले, त्या परिस्थितीचे चित्रण दया पवार यांनी केले. ‘बलुतं’ म्हणजे तुमचं-आमचं साहित्य आहे. दया पवार यांच्या नावाचा पुरस्कार मला माझ्या माहेरचा सन्मान वाटतो. फारसं शिक्षण न झालेल्या माझ्यासारख्या कलावंताला हा पुरस्कार दया पवारांच्या कर्मभूमीत मिळाला याचाही मनस्वी आनंद आहे.

जीवनात मी खूप खस्ता खाल्ल्या, त्रास सहन केला. शिक्षणक्षेत्रात नापास झाले, तरी नाट्यक्षेत्रात जिद्द, मेहनत व चिकाटीच्या अभ्यासाच्या जोरावर पास झाले, असेही कांबीकर म्हणाल्या.

प्रास्ताविक दया पवार यांची कन्या कवयित्री प्रज्ञा पवार यांनी केले. कार्यक्रमास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हिराबाई पवार, प्रशांत पवार, प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, प्रा. स्नेहल रूपवते, रघुवीर खेडकर, वैशाली लोखंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाऊसाहेब चासकर यांनी केले.