आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माय-बाप शेतकऱ्यांनो, आत्महत्या नका हो करू...'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आमच्या वडिलांनी चूक केली, तुम्ही अशी चूक करू नका. माय-बाप शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका, अशी आर्त साद आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चिमुकल्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घातली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण संगोपन करणाऱ्या आधारतीर्थ आधारश्रमातील चिमुरडे सध्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या १६ जिल्ह्यांत दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने ही दिंडी काढण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या सिंदखेड राजा या पावनभूमीतून मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर युवराज संभाजी राजे यांच्या उपस्थितीत या दिंडीला सुरुवात झाली. सध्या ही दिंडी नगर जिल्ह्यात असून माळीवाडा बसस्थानक चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बळीराजा बचाव प्रबोधन दिंडीचे स्वागत करण्यात आले.
माळीवाडा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ दिंडीत सहभागी असलेल्या मुलांनी पथनाट्य सादर केले. आशयपूर्ण निरागसपणे या मुलांनी सादर केलेल्या पथनाट्यातून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. आमच्या वडिलांनी केलेली चूक करू नका, असा संदेश देत या चिमुकल्यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. उत्तर महाराष्ट्रातील धनंजय तोरवणे, रोहित इंगळे, मराठवाड्यातील सूरज पाटील, विदर्भातील अशोक पाटील, अंजली सावंत, पालघरची सुनीता थेतले, नाशिकची लक्ष्मी चौधरी, शहाद्याची पुष्पा मराठे, निफाडची शकुंतला गायकवाड या मुलांनी पथनाट्यानंतर मनोगत व्यक्त केले. या चिमुरड्यांनी सादर केलेले पथनाट्य पाहून प्रभावित झालेले महापौर अभिषेक कळमकर यांनी या मुलांसाठी मदत देणार असल्याचे जाहीर केले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कर्डिले, तारकराम झावरे, अतुल लहारे, नगरसेवक मोहन कदम, संजय घुले, अमोल भगत, अवधुत पवार, चंद्रभान ठुबे, गणेश गायकवाड, आकाश बोराडे यावेळी उपस्थित होते.
या मुलांना आधार मिळेल का कुणाचा?
कर्जबाजारीपणा नापिकी यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत. अशा शेतकऱ्यांची मुले उघड्यावर येत असून त्यांच्या आधारासाठी कुणी पुढे येत नाही. आत्महत्येनंतर चिमुरड्यांवर कोसळणारे आभाळ त्यांच्याच शब्दांत प्रभावीपणे मांडण्यात येत आहे.'' त्रिंबक गायकवाड, संचालक,आधारतीर्थ.
छायाचित्र: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या चिमुरड्यांच्या प्रबोधन दिंडीचे स्वागत करताना मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कर्डिले, राजेश परकाळे, गणेश गायकवाड, अवधूत पवार, अतुल लहारे, चंद्रकांत ठुबे आदी.