आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - दीपावली म्हणजे दिव्यांचा सण, आंतरबाह्य अंधकाररूपी दु:ख दूर करून सौख्य व भरभराटीसाठी हा सण लहानांपासून मोठय़ांपर्यंत मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त नगर शहरात रंगीबेरंगी पणत्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पणत्यांच्या खरेदीसाठी नवीपेठ, कापडबाजार गर्दीने गजबजला आहे.
दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर आली आहे. या सणात मातीपासून बनवलेल्या पणत्यांना मागणी असते. त्याच्या जोडीने नवनवीन प्रकारच्या आकर्षक पणत्या बाजारात आल्या आहेत. नक्षीदार पणत्या त्रिकोणी, गोलाकार, चौकोनी आदी आकारांत उपलब्ध आहेत. मेणापासून बनवलेले दिवेही उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक्स पणत्यांनाही मागणी वाढली आहे. पणत्यांच्या माळांसह समई असलेल्या पणतीलाही मागणी आहे.
बिहारचे विक्रेते नगरमध्ये
बिहारमधील विक्रेत्यांनी नवीपेठ, कापडबाजार, गंजबाजार, नगर महाविद्यालय, प्रोफेसर कॉलनी, पाइपलाइन या भागात पणत्यांचे स्टॉल लावले आहेत. या पणत्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत.
सुगंधी अन् तरंगणार्या
हौशी मंडळी दीपोत्सव साजरा करण्यासाठी पणत्यांबरोबरच मेणबत्त्यांचीही मोठय़ा प्रमाणात खरेदी करतात. कापडबाजारातील दुकानांमध्ये पाण्यावर तरंगणार्या व सुगंधी मेणबत्त्या आकर्षक रंगांत विक्रीसाठी आल्या आहेत. त्या खरेदीसाठी हौशी मंडळीचा कल वाढला आहे. इतर वस्तुंच्या खरेदीबरोबर पणत्या व अन्य दिव्यांच्या खरेदीलाही सध्या मोठी गर्दी होत आहे.
राजस्थानच्या पणत्या
इंदूर, राजस्थान या ठिकाणच्या पणत्या नगरमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. स्थानिक पणत्यांपेक्षाही बाहेरून विक्रीसाठी आलेल्या पणत्या अधिक आकर्षक आहेत. पारंपरिक पणत्यांपेक्षा रंगीबेरंगी आकर्षक पणत्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा विशेषत: महिलावर्गाचा कल वाढला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पणत्यांचे दर यंदा पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढले आहेत.’’ मयूर फिरोदिया, पणती विक्रेता.
मेणबत्त्या लक्ष वेधून घेतात
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत सायंकाळी मोठी गर्दी होते. बहुरंगी रांगोळी व पणत्या पाहून मन प्रसन्न होते. सजलेल्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या मेणबत्त्या लक्ष वेधून घेतात. मुले शाळेत जातानाच कोणती वस्तू खरेदी करायची हे ठरवून येतात अन् घरी आल्यानंतर तेच खरेदी करण्याचा आग्रह धरतात. बाजारात उपलब्ध विविध आकर्षक पणत्यांमुळे खरेदी करणाराचा गोंधळ उडतो.’’ कविता भगत, गृहिणी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.