आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यू - गरज नसतानाही प्लेटलेट्स देण्याचे प्रकार; रुग्णांना भुर्दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - डेंग्यूच्या साथीचा बागुलबुवा करून रुग्णांना अनावश्यक प्लेटलेट्स देण्याचे प्रकार शहर व जिल्ह्यात सुरू आहेत. डॉक्टरांची संघटना असलेल्या आयएमएने पुढाकार घेऊन डेंग्यू उपचार पद्धतीबाबत जनजागृती करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, ही सूचना करून आठवडा उलटत आला, तरीही डॉक्टरांची बैठक होऊ शकलेली नाही.

डेंग्यूच्या साथीने गेल्या महिनाभरापासून शहर व जिल्ह्याला त्रस्त केले आहे. डेंग्यूची साथ येण्याचे हे पहिलेच वर्ष नाही. अपवाद वगळता दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर साथ ठरलेली आहे. मात्र, यावर्षी प्लेटलेट्सचा मुद्दा पहिल्यांदाच तीव्रतेने पुढे आला. सर्वसाधारण व्यक्तीच्या रक्तात दीड ते साडेचार लाख प्लेटलेट्स असतात. डेंग्यूत प्लेटलेटचे प्रमाण खाली येते. मात्र,आठवडाभराच्या उपचार व विश्रांतीने हे प्रमाण पूर्ववत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वीच्या साथींमध्येही रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होण्याचे प्रमाण आढळत होते. मात्र, यावर्षी रुग्णांकडून प्लेटलेट्सला सर्वाधिक मागणी आहे.

प्रसारमाध्यमांतून अधिक चर्चा व तत्पूर्वी शहरात आलेल्या काविळीच्या साथीमुळे डेंग्यूबाबत यावर्षी अधिक सतर्कता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून घेण्यात येत आहे. डेंग्यूचा बाऊ करून गरज नसतानाही प्लेटलेट्स देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. प्लेटलेट्स सुरक्षित ठेवण्याचा कालावधी अवघा पाच दिवसांचा असल्याने त्या उपलब्ध होण्यासाठी रक्तदानाची वारंवारितेत सातत्य हवे असते. मात्र, सण व सुट्यांमुळे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात अडथळे आले. त्यामुळे रक्तपिशव्या व प्लेटलेट्सचा तुटवडा निर्माण झाला.

याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आयएमएच्या माध्यमातून डॉक्टरांची बैठक घेऊन डेंग्यूच्या उपचारपद्धतीबाबत जनजागृती करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार आयएमएने तातडीने पावले उचलून बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र, आठवडा उलटला, तरीही संघटनेकडून तशी बैठक घेण्यात आलेली नाही. जनजागृतीपर फलक, पोस्टर्स डॉक्टरांकडे देण्यात येत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

जागतिक आरोग्य संघटनेकडून डेंग्यूच्या उपचार पद्धतीबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत. किमान या निर्देशांचे पालन होण्याची आवश्यकता आहे. डेंग्यू हा विषाणूजन्य तापाचा प्रकार आहे. सुरुवातीचे तीन दिवस अधिक महत्त्वाचे असतात. याच कालावधीत प्लेटलेट्स कमी होण्याचे प्रमाण वाढते. सात ते आठ दिवस ताप राहतो. डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार व आरामाने आजार बरा होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पावसामुळे फायदा
डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नुकत्याच झालेल्या पावसाने साचलेले पाणी प्रवाही बनले आहे. पुन्हा हे पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. आठवड्यातून एक दिवस "कोरडा दिवस' पाळण्याचे आवाहन प्रतिबंधात्मक योजनेत केले जाते. या प्रभावी उपायाचा सर्वाधिक वापर होण्याची गरज आरोग्य यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

निमा, आयएमएची संयुक्त बैठक घेऊ
^डेंग्यू फैलावू नये, यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दरवर्षी दिली जाते. यावर्षीही जनजागृती करण्यात आली आहे. प्लेटलेट्स देण्याबाबत काही गैरप्रकार होत असतील, तर निमा व आयएमएची संयुक्त बैठक घेऊन डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात येईल.'' एस. एम. सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक.

आजच्या बैठकीत नियोजन अपेक्षित
^ जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार माहिती फलक व पत्रके तयार करून डॉक्टरांकडे पाठवण्यात येतील. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी (१९ नोव्हेंबर) बैठक होत आहे. या बैठकीत डॉक्टरांची बैठक घेऊन जनजागृती करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.'' डॉ. विलास जोशी, जिल्हाप्रमुख, आयएमए.

रुग्णांची परिस्थिती पाहून उपचार
^ प्लेटलेट्सचे प्रमाण व रुग्णाची परिस्थिती याची सांगड घालून प्लेटलेट्स देण्याचा निर्णय घेण्यात येतो. प्लेटलेट्सचे प्रमाण २० हजारांच्या खाली गेल्यास डॉक्टर तसा निर्णय घेतात. मात्र, प्रत्येक रुग्णाची परिस्थिती सारखी नसते. रुग्णाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातो.''
डॉ. शैलेंद्र पाटणकर.