आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पकार डेंगळे यांचे पुण्यात 21 ला प्रात्यक्षिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-रांजणशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेले नगर येथील कलावंत अनिल डेंगळे यांच्या आगळ्या वेगळ्या कलेचे प्रात्यक्षिक 21 जानेवारीला पुण्यातील रसिकांना पाहता येणार आहे. यानिमित्ताने ते नवोदित कलावंतांशी संवादही साधतील.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात येत्या सोमवारपासून (20 जानेवारी) तुलसी आर्ट ग्रूपचे कलाप्रदर्शन सुरू होत असून प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी दुपारी दोन वाजता डेंगळे यांचे प्रात्यक्षिक व व्याख्यान सुरू होईल.

मातीच्या रांजणावरील टेराकोटा शिल्प ही डेंगळे यांची खासियत आहे. त्यांनी तयार केलेली काही शिल्पे नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. रामायण, महाभारत, तसेच शिवचरित्रातील काही प्रसंगांवर आधारित शिल्पाकृती त्यांनी तयार केल्या आहेत. त्यांच्या शिल्पांतील मानवी आकृतीवर प्राण्यांचा विशेष प्रभाव जाणवतो. काही शिल्पांना आध्यात्मिक डुब आहे, तर काही शिल्पे परग्रहवासीय म्हणजे ‘एलियन्स’ची आठवण करून देतात. नऊ वर्षांपूर्वी चित्रकला शिक्षक म्हणून डेंगळे निवृत्त झाले. 1980 पासून रेखाटलेली सुमारे तीन हजार रेखाटने त्यांच्या संग्रही असून त्यावर आधारित टेराकोटा शिल्पे ते केडगावमधील घरात तयार करतात. कुंभारकामासाठी लागणारी माती ते या शिल्पांसाठी वापरतात. विविध ठिकाणी त्यांनी आपल्या कलेची प्रात्यक्षिके सादर केली आहेत. नुकतेच रचना कला महाविद्यालयात त्यांचे प्रात्यक्षिक झाले.

तुलसी आर्ट ग्रूपचे हे 22 वे प्रदर्शन आहे. या ग्रूपचे संस्थापक सुरेश लोणकर वर्षभर नव्या पिढीतील कलाकारांना शिक्षण देऊन नंतर त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवतात. यंदाच्या प्रदर्शनात अकरा कलावंतांचा सहभाग असून त्यात काही प्रथितयश कलावंत व काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नगर येथील शुभंकर प्रमोद कांबळे यांच्या कलाकृतीही या प्रदर्शनात असतील. प्रदर्शनाचे उदघाटन प्रसिद्ध चित्रकार दत्ता पाडेकर व प्रमोद कांबळे यांच्या उपस्थितीत 20 जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता होत असून नंतर पाडेकर प्रात्यक्षिक सादर करतील.

पुण्यातील तुलसी आर्ट ग्रूपतर्फे बालगंधर्व कलादालनात आयोजित प्रदर्शनासाठी डेंगळे यांचा निमंत्रण

लोणकर यांचे नगरशी जुने ऋणानुबंध


तुलसी आर्ट ग्रूपचे संस्थापक सुरेश लोणकर मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील तेडगावचे रहिवासी. नगर येथील प्रसिद्ध सनईवादक बाळासाहेब राऊत हे त्यांचे आतेभाऊ. लोणकर यांचे बरेचसे लहानपण नगरलाच गेले. पुण्यातील प्रसिद्ध तुलसीबागेतील रामाचे ते सेवेकरी असून त्यांची चौथी पिढी तेथे वास्तव्यास आहे.