आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरोग्य विभागावर ताशेरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आपण समाधानी नाही, असे सांगत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी मंगळवारी संबंधितांवर ताशेरे ओ‍ढले.
जिल्हाभरात ठिकठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने पत्रकारांनी अध्यक्ष गुंड यांच्याशी संवाद साधला. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती मीरा चकोर, सभापती शरद नवले, माजी सभापती हर्षदा काकडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.
गुंड म्हणाल्या, आरोग्य विभागामार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी सुरू असून संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासणी पाठवले जात आहेत. धूर फवारणीही केली जात आहे. तथापि, या उपाययोजनांबाबत मी समाधानी नाही. आरोग्य विभाग कारभारात सुधारणा करेल, असा माझा विश्वास आहे.
जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर विशेष सभा बोलावण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. त्यामुळे अध्यक्षांनी आरोग्याच्या प्रश्नाबरोबरच टंचाईप्रश्नी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी सदस्यांमधून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेलार म्हणाले, विशेष सभा बोलावून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आरोग्य विभागामार्फत प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. हा आजार जिल्ह्यापुरता नसून देशात सर्वत्र या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
साध्या तापामुळेदेखील प्लेटलेट कमी होतात. जलद ताप सर्व्हेक्षणाचे आदेश दिले असून, पथकामार्फत तपासणी केली जात आहे. दर बुधवारी आरोग्य शिबिरे राबवून तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात येणार आहेत, असे शेलार यांनी सांगितले.
...त्या ग्रामपंचायतीवर कारवाई
ग्रामपंचायतींनी डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. एखादी ग्रामपंचायत कामचुकारपणा करत असेल, तर संबंधित ग्रामपंचायतीवर कडक कारवाई केली जाईल. आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या सर्व्हेक्षणात डासांचे प्रमाण कुठे जास्त आहे, हे समोर येईल, असेही शेलार यांनी सांगितले.