आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहरात 34 डेंग्यूसदृश रुग्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर शहरात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांत असे 34 रुग्ण आढळून आले. त्यापैकी दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना राबवण्यात येत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ओढे-नाले, ड्रेनेज, गटार व चेंबरची साफसफाई करणे आवश्यक होते. मात्र, जूनचे तीन आठवडे उलटले, तरी साफसफाईचे काम पूर्ण झालेले नाही. चौकांमध्ये व रस्त्यांच्या कडेला पडलेला कचरा, फुटलेले ड्रेनेजलाइन, तुंबलेली गटारे यामुळे डासांची पैदास मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफाइड या आजारांची लागण झाली आहे. डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या दोन महिन्यांत शहरात 34 डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले. त्यापैकी दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची प्रकृती सुधारली असली, तरी डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरू आहे.

मनपा प्रशासन, तसेच आरोग्य विभागाकडून आतापर्यंत तसे कोणतेच प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आलेले नाहीत. आरोग्य विभागाकडे कर्मचार्‍यांची कमतरता आहे. सुमारे साडेचार लाख लोकसंख्येच्या शहरात अवघ्या 28 कर्मचार्‍यांमार्फत धूर फवारणी व डासअळी नाशक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. हिवताप व मलेरिया विभागाकडून तीन महिन्यांसाठी मानधन स्वरूपात 30 कर्मचारी मिळावेत, अशी मागणी मनपाच्या आरोग्य विभागाने केली आहे. शुक्रवारी (21 जून) या कर्मचार्‍यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाने गेल्या वर्षी योग्य नियोजन केल्याने हिवताप व मलेरिया विभागाकडून वेळेत कर्मचारी उपलब्ध झाले होते. यंदा मात्र नियोजन कोलमडल्याने औषध फवारणीला उशीर झाला आहे. डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्यास तत्काळ माहिती द्यावी, अशा सूचना मनपाच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.

जिल्ह्यातही रुग्णांची संख्या मोठी
जिल्ह्यातील विविध गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात तापाची लागण झाली आहे. 73 रुग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी काहींना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मोठय़ा गावांना भेटी देऊन तेथील ग्रामपंचायतींना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’’ कारभारी खरात, जिल्हा आरोग्याधिकारी, जि. प.

नागरिकांनी दक्षता घ्यावी
शहरातील विविध भागात धूर फवारणी व डासअळी नाशक औषध फवारणी सुरू आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी 7 आरोग्य केंद्रांत सुविधा आहे. हिवतापाचा प्रसार करणार्‍या ‘अँनाफिलिस’ व डेंग्यू तापाचा प्रसार करणार्‍या ‘एडिस’ या दोन्ही जातींच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ व साठलेल्या पाण्यात होते. त्यामुळे नागरिकांनी घराच्या परिसरात पावसाचे, तसेच नळाचे पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.’’ डॉ. सतीश राजूरकर, आरोग्याधिकारी, मनपा

80 हजारांचा भुर्दंड
ताप आल्याने मुलाला खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी ऐनवेळी डेंग्यूची लागण झाल्याचे सांगून पुण्याला हलवण्यास सांगितले. त्यानुसार मुलाला पुणे येथील केईएम रुग्णालयात नेले. तीन दिवसांच्या उपचारानंतर मुलगा बरा झाला. या धावपळीत 80 हजारांचा भुर्दंड सहन करावा लागला. महापालिकेने वेळीच धूर फवारणी व डासअळी नाशक औषधांची फवारणी केली असती, तर ही वेळच आली नसती.’’ डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाचे वडील, माळीवाडा.