आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात डेंग्यूची धास्ती कायम, साथ आटोक्यात असल्याचे दाखवण्यासाठी मनपा प्रशासनाचा आटापिटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - डेंग्यूचीसाथ आटोक्यात असल्याचे दाखवण्यासाठी महापालिका प्रशासनाचा आटापिटा सुरू आहे. अमूक उपाययोजना केल्या असून रुग्णांची संख्या कमी झाल्याचा दावा प्रशासन वारंवार करत आहे. प्रत्यक्षात मात्र रुग्णांची संख्या वाढतेच अाहे. तोकड्या उपाययोजनांमुळे या संख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत अाहे. खासगी रुग्णालयांमध्ये सध्या रुग्णांची गर्दी झाली आहे. शासकीय पातळीवर वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.

शहरातील डेंग्यूची साथ आटोक्यात आली असल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. मनपाच्या आकडेवारीनुसार अातपर्यंत १३ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असली, तरी ही संख्या अधिक आहे. मनपाच्या दप्तरी ९२ हजार मालमत्तांची नोंद असताना आतापर्यंत केवळ पाचशे घरांच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली आहे. यावरूनच मनपाच्या उपाययोजना कशा तोकड्या स्वरूपाच्या आहेत, ते स्पष्ट होते. एकीकडे डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे साथ आटोक्यात आल्याचा खोटा दावा मनपा प्रशासन करत आहे. विशेष म्हणजे डेंग्यूची लागण झालेले डेंग्यूसदृश रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. जिल्हा रुग्णालय वगळता शासकीय पातळीवर कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे. महिनाभरापासून शहरात डेंग्यूची साथ सुरू आहे. केडगाव, स्टेशन रोड, बुरूडगाव रस्ता, मध्यवर्ती, तसेच सावेडीतील काही भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. मनपाच्या अारोग्य विभागाने डेंग्यूसदृश रग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयाेगशाळेत पाठवले. त्यात १३ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हे रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असल्याचा दावा मनपाने दोन आठवड्यांपूर्वी केला होता. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. प्रत्यक्षात मात्र या उपाययोजना तोकड्या असल्याने डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आढावा बैठकीत गोलमाल उत्तरे
शहरातीलसाथीच्या आजारांबाबत महापौर अभिषेक कळमकर यांनी वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या. बैठकांमध्ये आरोग्य विभागातील संबंधित अिधकाऱ्यांनी सर्व काही अलबेल असल्याचे चित्र उभे केले. शिवाय डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरु असल्याची गोलमाल उत्तरे दिली.

ते १० हजारांचा खर्च
डेंग्यूसदृशरुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. खासगी रुग्णालयात "रॅपिड एनएस १' या चाचणीद्वारे डेंग्यूचे निदान करण्यात येते. ही चाचणी करण्यासाठी आठशे ते एक हजार रुपये खर्च येतो. शिवाय रुग्णालयात चार ते पाच दिवस अॅडमिट व्हावे लागते. त्यामुळे हजारो रुपये उपचारावर खर्च करावे लागत आहेत. मनपाने वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर हा खर्च वाचला असता, अशी प्रतिक्रिया रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.

आरोग्य केंद्र नावालाच
शहराच्याविविध भागात महापालिकेची सात आरोग्य केंद्रे आहेत. परंतु ही केंद्रे केवळ नावालाच उरली आहेत. एकाही आरोग्य केंद्रात रुग्णाला वैद्यकीय सुविधा मिळत नाही. काही आरोग्य केंद्रांची अवस्था तर एखाद्या गोदामासारखी झाली आहे. एकीकडे शहरात साथीच्या आजारांनी थैमान झातले आहे, तर दुसरीकडे आरोग्य केंद्र शोभेपुरती उरली आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रुग्णांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.

ठोस उपाययोजना नाहीच
मनपाच्याआरोग्य विभागाने गृहभेटी आयोजित केल्या अाहेत. रेल्वेस्टेशन परिसरात साठलेल्या पाण्यात डासाच्या अळींचे प्रमाण जास्त आढळले. सावेडी भागात फ्रिज, कूलरमधील पाणी, मनिप्लॅण्टच्या बाटल्या, टेरेसवरील प्लास्टिक कुंड्यांमध्ये डासाच्या अळी आढळल्या. डासांची पैदास करण्यासाठी नागरिकांकडून अजाणतेपणी प्रोत्साहन दिले जाते, असे निदर्शनास आले असल्याचे आरोग्य विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मनपाने अद्याप कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

मनपाच्या आरोग्य विभागाचा दावा
शहरातील५०० घरांच्या परिसरात धूर फवारणी.
१६ ते ३१ जुलै हा पंधरवाडा डेंग्यू जागृती मोहीम म्हणून राबवण्यात आला.
महापालिकेसह ४० माध्यमिक शाळांमध्ये दिली डेंग्यूची माहिती.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य सभेद्वारे मार्गदर्शन.
केडगाव स्टेशन रोड परिसरात माहिती पत्रकांद्वारे केली जनजागृती.
सुमारे १० हजार घरांचे सर्वेक्षण केल्याचा दावा.
एक हजार ८०० कंटेनर कर्मचाऱ्यांनी तपासले.
लाऊड स्पिकर, रिक्षा केबलच्या जाहिरातीद्वारे केली जाते जनजागृती.
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे नागरिकांना आवाहन.
खासगी रुग्णालयांना रुग्णांची माहिती कळवण्याच्या सूचना.

खासगी सरकारी चाचण्यांचा गोंधळ
खासगीरुग्णालयातील "रॅपिड एनएस १' या चाचणीनुसार एखाद्या रुग्णाला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, तरी सरकारी यंत्रणा मात्र या चाचणीचा अहवाल ग्राह्य धरत नाहीत. सरकारी "एलायझा' चाचणीनुसारच डेंग्यूची रुग्णसंख्या मोजली जाते. त्यामुळे डेंग्यूच्या खासगी सरकारी आकडेवारीत मोठी तफावत आहेत. खासगी चाचणीनुसार शहरात शंभरपेक्षा अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. सरकारी चाचणीनुसार मात्र हा आकडा केवळ १३ अाहे. विशेष म्हणजे सरकारी चाचणीच्या अहवालानुसारच उपाययोजनाही करण्यात येतात.